- आशिष राणेवसई : पालघर लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय संपादन केल्यावर विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा विजय मिळवण्याच्या दृष्टीनेच शिवसेना आणि मित्र पक्ष वसईत उतरलेले दिसतात. मात्र, मुळातच विरोधकांकडे कधीही सत्ता नव्हती. त्यामुळे विरोधक विकासाच्या मुद्यावर काही बोलू शकत नाहीत, असे मानणारा एक वर्ग येथे दिसून येतो.
महायुतीचे उमेदवार विजय पाटील यांनी जरी प्रचारासाठी सत्ताधारी बहुजन विकास आघाडीवर कितीही आरोप केले तरी विजय पाटील यांनी आपल्या प्रचारात आजवर केलेली विकासकामे मांडण्यावर भर दिला. वसई मतदारसंघातून विजय मिळवण्यासाठी मिळविण्यासाठी बविआ व महायुती या दोघांचेही जोरदार प्रयत्न दिसले. मनसेसह अन्य तीन उमेदवार रिंगणात आहेत. तरी येथे मुख्य लढत बविआ विरूद्ध शिवसेना अशीच दिसणार आहे.
वसईत पराभव झाल्यानंतर बविआने वसई मतदारसंघावर साडेचार वर्षे संपूर्ण लक्ष केंद्रित केले. जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रि य करणे, जनसंपर्क कार्यालये सुरू करणे यासह ग्रामीण भागात घटलेला जनाधार वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. याचबरोबर गावोगावी संपर्क ठेवत नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यावर भर दिल्याचे दिसते.
दुसरीकडे वसई आणि नालासोपारा या दोन्ही जागा भाजपला हव्या होत्या. मात्र या दोन्ही जागा सेनेच्या वाट्याला आल्याने भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यातच येथील भाजपचा मुख्य गटाने शिवसेनेचा प्रचार करणार नाही, असा पवित्राही घेतला आहे. त्यामुळे दोघांचे भांडण बविआचा फायदा होणार का, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. याशिवाय येथील ख्रिस्ती मतदार कुणाच्या पारड्यात मते टाकतो, हेही महत्त्वाचे आहे.