पालघर: मच्छीमारांना भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांवर आपण तोडगा काढणार असून त्यात प्रामुख्याने एलईडी लाईटचा प्रश्न आहे. याचबरोबर डिझेल परतावा मिळवून देण्याचे वचनही मी निश्चितच पूर्ण करेन. देशाला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे उलटल्यानंतरही आदिवासी समाजाच्या परिस्थितीत बदल झाला नसल्याबद्दल खेद व्यक्त करीत वनपट्टे, आरोग्य सुविधा, मुलींना विनामूल्य महाविद्यालयीन शिक्षण, एक रुपयात आरोग्य चाचणी आदी सुविधा पुरवून त्यांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यात येईल असे त्यांनी सांगितले. धनगर समाजाला आरक्षण देताना आदिवासी समाजाचे आरक्षण कमी करण्यात येईल असे विरोधकांकडून आदिवासींना भडकविण्यात येते. मात्र त्यांच्या ताटातील एक कणभरही हिसकावून न घेता धनगर समाजाला आरक्षण देण्यात येईल असे ठाकरे यांनी सांगितले. पालघर आणि बोईसर येथील उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे गुरुवारी मनोर येथे आले होते.
लोकसभा निवडणुकीत बविआची गुंडागर्दी तोडून मोडून टाकल्याचे सांगून काही मांजरे बविआने बंडखोर म्हणून उभी केल्याचा उल्लेख केला. तर, शिवसेनेसमोर उभे राहण्याची तुमची लायकी नाही अशी बोचरी टीका बोईसरमधील भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार संतोष जनाठे यांच्यावर केली. विकासाच्या आड येणारी ही मांजरे २१ तारखेला मतदानाच्या दिवशी उसळणाºया भगव्या वादळात पालापाचोळ्यासारखी उडून जातील. युतीच्या पाच वर्षांच्या कामकाजाचा अभिमान असल्याचे सांगत देशाच्या विकासाला प्राधान्य दिल्याने पाठिंबा दिल्याचे सांगितले.
३०० युनिट पर्यंतच्या वीज दरात ३० टक्के कपात करणार, अल्पभूधारक शेतकऱ्यांना १० हजार वार्षिक देणार, आरोग्य सेवा बळकट करणार, गावाजवळ सौरऊर्जा प्रकल्प उभे करून गावांना वीज देणार, आदी वचननाम्याचा उल्लेख करीत राज्याच्या विकासासाठी आमचे हाथ बळकट करा असे आवाहन केले. जिल्ह्यातील ४ विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे उमेदवार उभे असून २ जागेवर भाजप उमेदवार उभे आहेत. त्यामुळे युतीचा धर्म पाळून एकमेकांना मदत करा. शिवरायांचे नाव आणि हातात भगवा घेणारा हा निष्ठावन्त असतो, तो कधीच दगाफटका करीत नाही, असे सांगून भाजप, शिवसेनेच्या सोबतीला मतदार उभा राहिल्यास एक वेगळ्या उंचीवरचा महाराष्ट्र तुम्हाला बघायला मिळेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.
पालघरमध्ये आलेल्या मुख्यमंत्र्यांनी बंडखोरी खपवून घेतली जाणार नाही असे जाहीर केल्याचे सांगून बोईसर विधानसभेत शिवसेनेचे उमेदवार आणि बंडखोर अपक्ष उमेदवार संतोष जनाठे यांच्या लढाईत तिसराच निवडून येईल अशी भीती एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करीत पुढच्या पाच वर्षाच्या विकासासाठी सेनेच्या उमेदवारालाच निवडून देण्याचे आवाहन शिंदे यांनी केले.
यावेळी ठाणे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. राजेंद्र गावित, सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, आ. रवींद्र फाटक, श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित, पाटबंधारे विभागाचे अध्यक्ष जगदीश धोडी, कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील आदी उपस्थित होते.
पालघरकरांचे ऋण विसरणार नाही
पालघर लोकसभेत पहिल्यांदाच सेनेचा खासदार राजेंद्र गवितांच्या रूपाने निवडून दिल्याबद्दल पालघरकरांचे ऋण मी कधीच विसरणार नाही असे सांगून पाटबंधारे विभागाचे अध्यक्ष जगदीश धोडी व माजी आमदार अमित घोडा यांची काही काळासाठी निर्माण झालेली नाराजी आता शमली असून या दोघांनी स्वत:साठी माझ्याकडे काहीही मागितले नाही. पण या दोघांनाही मी वाºयावर सोडणार नाही. त्यांना सन्मानाचे पद देऊ असे आश्वासन त्यांना दिले.बदल घडवायचा असेल तर शिवसेनेला पर्याय नाही
शिवसेना जिथे जिथे जाते तिथली गुंडगिरी, दहशत मोडून टाकते. येथील गुंडगिरी संपवण्यासाठी ‘अरे ला का रे’ करणारा प्रदीप शर्मा नावाचा उमेदवार दिला आहे. एखादी गोष्ट फेकायची असेल तर मुळासकट उखडून फेकून टाकायची, तुम्ही जे भोगता तेच पुढच्या पिढीने भोगायचे आहे का? सुविधा मिळावी वाटत नाही का, बदल घडवायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही, असे सांगत नालासोपाºयात प्रदीप शर्मा आणि वसईत विजय पाटील या दोघांना निवडून आणा, असे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरारमधील जाहीर सभेत केले.
पालघर जिल्ह्यातील युतीचे सहाही आमदार निवडून येणार असून त्यासाठी जीवदानी मातेला साकडे घातले आहे. निवडून आल्यावर आशीर्वाद घेण्यासाठी सहाही आमदारांना घेऊन दर्शनासाठी येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी बहुजन विकास आघाडीवर टीका करताना येथील अनेक समस्यांचा पाढा वाचून दाखवत, आपण कोणत्या काळात रहात आहोत, याचा विचार करा, असेही त्यांनी सांगितले. येथील अनधिकृत बांधकामांमुळे दोन दिवसांपूर्वी ४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. त्यात तिचा काय दोष होता, अशी विचारणही त्यांनी केली. वसई चिमाजी अप्पांची अशी ओळख होती.
मात्र आता ती ओळख या गुंडांमुळे पुसली गेल्याचेही ते म्हणाले. हीच ओळख परत मिळवून देण्यासाठी प्रदीप शर्मा यांना आम्ही जाणीवपूर्वक उमेदवार म्हणून दिले आहे. त्यामुळे शर्मा निवडून आल्यावर आमदार म्हणून नाही तर सर्वसामान्यांचे रक्षक आणि प्रतिनिधी होतील. बहुजन विकास आघाडीने महाआघाडी केली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी पाठिंंबा दिला आहे. त्यांचे कोणत्याही पोस्टरमध्ये फोटो का टाकले जात नाही, असा सवालही उपस्थित केला. आम्ही महायुती केली असून उघडपणे फोटो लावतो तुम्ही मित्र पक्षांचे फोटो का नाही लावत अशी विचारणाही बविआला करण्यात आली.