पालघर - वसई, विरार, नालासोपारा, पालघर, डहाणूला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं आहे. सलग तिसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचलं आहे. येथील जनजीवनदेखील विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे येथील कॉलेज-शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. जोरदार पावसामुळे रेल्वे व रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. डहाणूनहून विरारकडे जाणारी उपनगरीय रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. वाणगाव, बोईसर, पालघर, केळवे रोड आदी स्थानकांवर लोकल थांबवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगर, ठाण्यामध्येही जोरदार पाऊस सुरू आहे. येत्या 24 तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या लाईफलाईनवरही परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवरील वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिरानं सुरू आहे.
माटुंगा, दादर, वरळी, लालबागमध्ये पावसाची रिमझिम पाऊस सुरू आहे. मात्र पश्चिम उपनगरात पावसाचा जोर वाढला आहे. वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, दहिसरमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. मुलुंड, घाटकोपरमध्येही रिमझिम पाऊस आहे. मात्र ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथमध्ये पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. नवी मुंबईतही जोरदार पाऊस सुरू आहे.
वसई- विरार परिसरात जोरदार पाऊस, सनसिटी गास रोड पूर्ण पाण्याखाली