विरार : वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकारने पुन्हा एकदा कडक ‘लॉकडाऊन’चे संकेत दिले असल्याने नागरिकांची धास्ती वाढली आहे. याचा परिणाम म्हणून विरारमधील रेशन दुकानांवर सोमवारी सकाळपासून टोकन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत वैद्यकीय सुविधांचा असलेला अभाव यामुळे चिंता व्यक्त केली जात असून येत्या दोन दिवसांत पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. येत्या दोन दिवसांत असा निर्णय झाल्यास अन्नधान्याची गरज लक्षात घेऊन वसई-विरारमधील कार्डधारकांनी सकाळपासूनच रेशनिंग दुकानांवर टोकनसाठी रांग लावली होती. विरार-मनवेलपाडा येथील रेशन दुकानावर शेकडो लोकांनी रांग लावल्याने ही रांग एक किलोमीटरपर्यंत गेली होती. अचानक कार्डधारकांनी गर्दी केल्याने रेशन दुकानदारांचीही तारांबळ उडाली. त्यामुळे या दुकानदारांकडूनही तत्काळ टोकन वाटप करण्यात आले. टोकन वाटप झालेल्या कार्डधारकांना उद्यापासून धान्यवाटप करण्यात येणार असून; ३०० टोकनधारकांना एका दिवसात धान्यवाटप करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती रेशन दुकानदारांकडून देण्यात आली. एका रेशन दुकानावर अंदाजे २५०० कार्डधारक आहेत. या कार्डधारकांना तांदूळ व गहू वाटप करण्यात येणार आहे. लॉकडाऊन निर्णयाअगोदर पुढील दोन दिवसांत कार्डधारकांना धान्यवाटप करताना दुकानदारांचीही कसोटी लागणार आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर नागरिकांना सर्वाधिक पोटापाण्याचा प्रश्न भेडसावला होता. हातावर पोट असलेल्या अनेकांची गुजराण या दिवसांत रेशनच्या धान्यावरच झाली होती, मात्र रेशनवरील धान्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागली होती; वसई-विरारमध्ये तर पहाटेपासून लोक रेशनच्या रांगेत दिसत होते.
आम्ही योग्य नियोजन करीत आहोत. लोकांना समजावूनही लोक उगाच गर्दी करत आहेत. एका वेळी ३०० कार्डधारकांना टोकन दिले जात आहेत. उद्या सकाळपासून त्यांना धान्य वाटप केले जाईल. - रेशन दुकानदार, मनवेलपाडा
वीकेंड लॉकडाऊनमुळे दोन दिवस दुकान बंद होते. त्यामुळे लोकांनी अचानक गर्दी केली. टोकन देण्यास संबंधित दुकानदारांना सांगितले आहे. ३० एप्रिलपर्यंत रेशन दुकाने सुरूच राहणार आहेत. - रोशन कापसे, पुरवठा अधिकारी