विरार/पारोळ : कोरोनाची साखळी तुटावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते ३० एप्रिलपर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहेत. मात्र, वसई - विरारमध्ये मुख्यमंत्र्यांचे आदेश धाब्यावर बसवल्याचे दिसून आले. पहिल्याच दिवशी लॉकडाऊनचे तीनतेरा वाजले. अपुऱ्या बळामुळे पोलीस हैराण झाले असून, ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात नसल्याने नागरिकांचा मुक्त संचार सुरू होता.विरार आणि नालासोपारा रेल्वे स्थानकात तर प्रवाशांनी सकाळपासूनच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. लॉकडाऊनचा पहिलाच दिवस नागरिकांनी अक्षरश: धाब्यावर बसवल्याने लॉकडाऊनचे तीनतेरा वाजले. संचारबंदीत नागरिकांच्या वावरावर बंदी असताना नागरिक मात्र कशाचीही तमा न बाळगता बिनधोकपणे फिरत असल्याचे दिसून आले. शासनाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त असणे गरजेचे होते. मात्र, तसा पोलीस बंदोबस्तही कोठे दिसून आला नाही. अनेक पोलिसांनाच कोरोनाची लागण झाल्याने पोलीस बळाची वानवा दिसून आली. त्यामुळे सध्याच्या संचारबंदीत आणि वाढत्या गुन्ह्यांच्या आलेखावर नियंत्रण ठेवण्याची कसरत पोलिसांना करावी लागत आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील हैराण झाले आहेत.संचारबंदीत वाणसामानाची अडचण होऊ नये म्हणून नागरिकांनी सकाळपासूनच रेशन दुकानांत गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. रेशन दुकानांत रेशन घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांची गर्दी पाहता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या संचारबंदीच्या आदेशाची वसईत अक्षरश: पायमल्ली झाल्याचे दिसून आले. दरम्यान, वसईतील कोरोनाचा उद्रेक मोठा आहे. त्यामुळे शासनाने दिलेले आदेश शिरसावंद्य मानून नागरिकांनी कठीण काळात जबाबदारीने वागणे संयुक्तिक आहे. परंतु तशी वर्तणूक बहुसंख्य वसई-विरारकरांकडून होताना दिसली नाही.
Maharashtra Lockdown : वसईत संचारबंदीचे तीनतेरा, अन्यत्र चांगला प्रतिसाद; विरार, नालासोपारा रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 11:35 PM