नालासोपारा : आतापर्यंत इलाका तुम्हारा पर धमाका हमारा, असे होते. पण, लोकसभा निवडणुकीनंतर ‘इलाका भी हमारा है और धमाका भी हमारा ही रहेगा’, असे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी नालासोपाºयात केले. राजेंद्र गावित यांना लोकसभा निवडणुकीत प्रेम देऊन निवडून आणले. आता या वेळी मुंबईत ज्यांनी गुंडगिरी संपवली आहे, ते तुम्हाला पाहिजेत की नाही हे ठरवा, असे सांगत प्रदीप शर्मा हे आगामी विधानसभा निवडणुकीत नालासोपारा येथून शिवसेनेचे उमेदवार असतील, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.
आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा मंगळवारी वसई तालुक्यात आली होती. नालासोपारा पूर्वेकडील आंबावाडी येथील एका हॉलमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, नालासोपाºयात प्रवेश केला त्या वेळी वातावरणात बदल वाटला. नागरिक निवडणुकीची उत्सुकतेने वाट पाहत होते. कारण त्यांनाही येथील गुंडगिरी मोडून काढायची आहे. ती या निवडणुकीत मोडून निघणार असल्याचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला आहे. या वेळी त्यांनी नालासोपारा येथे भगवा फडकणारच, असा आत्मविश्वास व्यक्त केला.
विरार येथे लागलेल्या ‘चोर की पोलीस’ या बॅनरचाही उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. तुम्हाला कोण हवंय, हे तुम्ही ठरवा आणि इतरांनाही सांगा, असेही त्यांनी सांगितले. विजयाचा आशीर्वाद आधीच मिळाला असून आता इथली विकासकामे होणारच. ती जबाबदारी आमची असून इथे न्याय आणणे, कायदा सुव्यवस्थेचे राज्य आणण्याची जबाबदारी आमची असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली. या वेळी व्यासपीठावर मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजेंद्र गावित, खासदार राजन विचारे, रवींद्र फाटक, शिवसेनेचे संभाव्य उमेदवार प्रदीप शर्मा, विजय पाटील यांच्यासह अनेक पालघर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.