डहाणू/बोर्डी : डहाणू विधानसभा मतदारसंघात महाआघाडीकडून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले यांना उमेदवारी जाहीर केली असून भाजपने पुन्हा एकदा विद्यमान आ. पास्कल धनारे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. दरम्यान डाव्या विचारसरणीच्या कष्टकरी संघटनेने माकपला पाठिंबा दिल्याने महाघाडी विरुद्ध भाजप यांच्यात तुल्यबळ लढत अपेक्षित आहे.लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट (माकप) या पक्षात महाआघाडी झाली होती. त्यावेळी युतीचे उमेदवार राजेंद्र गावीत विजयी झाले असले, तरी डहाणू विधानसभा क्षेत्रात त्यांना महाआघाडीच्या उमेदवारापेक्षा ८, १४७ कमी मतदान झाले होते. लोकसभा निवडणुकी दरम्यान डहाणू विधानसभा माकपला देण्याचे ठरले होते. त्यानुसार महाआघाडीने आपला शब्द पाळला असून ही जागा आता माकपच्या वाट्याला आली आहे. दरम्यान, डाव्या विचारसरणीच्या कष्टकरी संघटनेने गेल्या पन्नास वर्षात माकपला कधीच साथ दिली नव्हती. मात्र नुकताच या दोन्ही पक्षांचा संयुक्त मेळावा तालुक्यातील वेती वरोती गावात पार पडला असून त्यामध्ये त्यांनी माकपला पाठिंबा जाहीर केल्याने त्यांची ताकद वाढली आहे.दरम्यान, भाजपकडून मंगळवारी उमेदवाराची घोषणा करताना पक्षाने पुन्हा एकदा पास्कल धनारे यांच्यावर विश्वास दाखवला आहे.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत डहाणूत सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. त्यामध्ये भाजप, शिवसेना, माकप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि माकपने तिकीट नाकारल्याने माजी आमदाराच्या पुत्राचा समावेश होता. त्यावेळी भाजपचे पास्कल धनारे (४४८४९), माकपचे बारक्या मांगात (२८१४९) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काशीनाथ चौधरी (२७९६३) यांच्यात लढत झाली होती. पास्कल धनारे यांना १६,७०० मताधिक्य मिळाले होते.२००९ साली माकपचे राजाराम ओझरे (६२५३०), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कृष्णा घोडा (४६३५०) आणि शिवसेनेचे ईश्वर धोडी (१७९५५) यांच्यामध्ये तिरंगी लढत होऊन राजाराम ओझरे यांना १६१८० मताधिक्य मिळाले होते.यापूर्वी माकपसह आम्ही एका व्यासपीठावर नव्हतो. मात्र सत्ताधाऱ्यांनी जिल्ह्याच्या माथी विविध प्रकल्प मारून स्थानिकांवर अन्याय केला आहे. सत्ताधारी जातीयवाद पसरवत आहेत. त्यांना रोखण्यासाठी माकप लढत असल्याने निवडणुकीत पाठिंबा दर्शविला आहे. - ब्रायन लोबोजमीन अधिग्रहण, बुलेट ट्रेन, रेल्वे कॉरिडॉर, वाढवण बंदर आदी प्रकल्प जिल्ह्यात येऊ घातल्याने त्याला भूमिपुत्रांचा असलेला मुद्दा दोघांनीही उचलून धरला आहे. धर्माच्या नावाखाली जातीयवादी तेढ निर्माण करीत असल्याने धर्मनिरपेक्षता हा समान मुद्दा आहे.
Vidhan sabha 2019 : महाआघाडीतर्फे माकपचे विनोद निकोले, तर भाजपकडून पुन्हा धनारे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 11:39 PM