- हितेन नाईकपालघर : महायुतीचा निर्णय आणि फॉर्म्युला ठरण्यापूर्वीच शिवसेनेने रविवारी काही उमेदवारांना एबी फॉर्म वाटले असले, तरी त्यात पालघरचे नाव नसल्याने पक्षाच्या इच्छुकांतील रस्सीखेच वाढल्याचा अंदाज लावला जात आहे. त्यातही लोकसभा निवडणुकीवेळी श्रीनिवास वनगा यांना दिलेला शब्द पाळला जाईल की मातोश्रीवरून नवा पर्याय घोषित केला जाईल, याबाबत शिवसैनिकांत उत्सुकता आहे.जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघांपैकी पालघर हा एकमेव मतदारसंघ अनेक वर्षांपासून सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अमित घोडा हे शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतर झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार; मात्र सध्या शिवसेनेचे खासदार असलेल्या राजेंद्र गावितांचा पराभव केला होता.पालघर मतदारसंघात दोन लाख ७३ हजार ५९ मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीत राजेंद्र गावितांना मतदारांनी तब्बल एक लाख ११ हजार ७९४ मतांनी विजयी केले होते. शिवसेनेचे ५, जिल्हा परिषद सदस्य आणि १९ पंचायत समिती सदस्यांची ताकद सेनेच्या उमेदवाराच्या मागे उभी राहणार असल्याचे चित्र येथे आहे.दरम्यान, २०१८ च्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये सेनेचे उमेदवार असलेले श्रीनिवास वनगा यांनी भाजपवर आपल्या वडिलांशी आणि कुटुंबियांशी गद्दारी केल्याचा आरोप केला होता. यामुळे युती झाल्यास भाजपकडून त्यांना मदत होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. भाजपचे अनेक पदाधिकारी खाजगीत आम्ही काम करणार नसल्याचे सांगत आहेत. बहुजन विकास आघाडीवगळता काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, मनसेची ताकद मर्यादित असल्याने शिवसेना विरुद्ध बविआ महाआघाडीतच येथे लढत अपेक्षित आहे.लोकसभा निवडणुकीवेळी राजेंद्र गावितांना उमेदवारी देताना उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवास यांना संधी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ती संधी विधानसभेला दिली जाईल, की विधान परिषदेवर हे स्पष्ट झालेले नाही. लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचा अनुभव श्रनिवास यांच्या गाठीशी नाही. शिवसेनेला अभिप्रेत असलेल्या आक्रमकपणाचा अभाव असल्यानेच अद्याप त्यांचे नाव जाहीर झालेले नाही. विद्यमान आमदार घोडा यांच्याबद्दल नाराजी आणि इच्छुकांपैकी डॉ. विश्वास वळवी आणि दिनेश तारवी यांच्या नावाचाही सध्या विचार सुरू आहे.पालघर विधानसभेसाठी लढण्याची इच्छा मी उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली असता, ‘कामाला लागा’ असे त्यांनी मला सांगितले आहे.- श्रीनिवास वनगा, इच्छुक उमेदवारपालघरसाठी शिवसेनेकडून अजून कुणाही अधिकृत उमेदवाराच्या नावाची घोषणा पक्षाकडून करण्यात आलेली नाही.- राजेश शहा, जिल्हाप्रमुख,शिवसेनाउमेदवार निवडीत मच्छीमारांचे प्रश्न, विविध प्रकल्प ठरणार कळीचेपालघर मतदारसंघात युतीची ताकद असली तरी काही स्थानिक प्रश्न, समस्यांबाबत उपाययोजनेसंदर्भात विद्यमान आमदार आणि पक्षाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने किनारपट्टीवरील मतदार नाराज आहे. लोकसभेवेळी पालघरच्या ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संघाच्या कार्यालयात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जिल्ह्यातील मच्छीमार प्रतिनिधी, स्थानिकांनी भेट घेतली होती. तेव्हा जिंदाल जेट्टीला मिळालेली परवानगी, समुद्रातील हद्दीचा वाद, डिझेलचे थकलेले कोट्यवधी रुपयांचे अनुदान, ओएनजीसी भरपाई आदी प्रश्न उपस्थित करण्यात आले. या समस्यांची मला जाणीव असून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले होते.या आश्वासनाला सात महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर एकही प्रश्न सुटला नसल्याने मच्छीमारांत नाराजी आहे. किती वर्षे आम्ही पक्षांचे झेंडे खांद्यावर घेऊन यांचे उमेदवार निवडून द्यायचे, असा प्रश्न आता येथील तरु ण मतदार विचारतो आहे. या प्रश्नांवर, समुद्रात येणाऱ्या प्रकल्पांवर विधानसभेत आवाज उठवून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणारा, मतदारांवर प्रभाव टाकणारा उमेदवार मिळाल्यास येथे असलेला युतीचा दबदबा टिकून राहू शकतो. पालघर नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी नगराध्यक्ष निवडीत मतदारांनी युतीला धक्का दिला होता. त्यामुळे येथील उमेदवाची निवड शिवसेनेसाठी कळीची ठरली आहे.
Vidhan Sabha 2019 : शिवसेनेची उमेदवारी श्रीनिवास वनगांना? पालघर विधानसभेसाठी वाढली इच्छुकांतील रस्सीखेच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 11:58 PM