वसई : आ. हितेंद्र ठाकूर प्रणित बहुजन विकास आघाडी या पक्षाला त्यांचे जुनेच ‘शिट्टी’ हे निवडणूक चिन्ह पुन्हा मिळाले आहे. बविआचे नेते तथा प्रवक्ते अजीव पाटील यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. जुनेच चिन्ह परत मिळाल्याने बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.२०१४ पर्यंतच्या निवडणुकांमध्ये याच चिन्हाचा वापर करण्यात आला होता. मात्र, वर्षभरापूर्वी झालेली लोकसभा पोटनिवडणुक आणि नुकतीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिट्टी हे निवडणूक चिन्ह पालघरच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी गोठवले होते. त्यामुळे लोकसभेला बविआला ‘रिक्षा’ या चिन्हावर समाधान मानावे लागले होते.लोकसभा निवडणुकीत पालघर लोकसभा मतदारसंघात ‘शिट्टी’ या निवडणूक चिन्हावरून बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेत मोठा संघर्ष झाला होता. त्यावेळी शिवसेनेने एक राजकीय खेळी खेळत बहुजन महापार्टी या पक्षाचा उमेदवार शिट्टी या चिन्हावर लोकसभा निवडणुकीत उतरवला होता. त्यामुळे मतदारात संभ्रम निर्माण करून बहुजन विकास आघाडीची राजकीय कोंडी करण्याची योजना त्यामागे होती.या कळीच्या मुद्द्यावरून त्यावेळी निवडणूक चिन्ह वाटपाच्या दिवशी मध्यरात्रीनंतरही पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ सुरू होता. अखेर हे ‘शिट्टी’ हे चिन्ह गोठविण्यात आले. त्यामुळे बविआला ‘शिट्टी’ चिन्हाशिवायच निवडणूक लढवावी लागली होती. आणि याचा राजकीय फटका बविआला बसला होता. अगदी कमी दिवसात पालघर लोकसभा मतदारसंघात नवीन निशाणी पोहोचवण्याचे अतिरिक्त काम त्यावेळी बविआ नेत्यांना व पदाधिकारी कार्यकर्ते यांना करावे लागले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीसाठी जवळपास महिनाभराचा अवधी असताना ‘शिट्टी’ हे निवडणूक चिन्ह बहुजन विकास आघाडी पक्षाला पुन्हा मिळाल्याने पक्षाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
Vidhan Sabha 2019: पालघरमध्ये बविआची ‘शिट्टी’ पुन्हा वाजणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 3:26 AM