जगदीश भोवडमुख्य उपसंपादक
वसई-विरारचे अनभिषिक्त सम्राट अशी ओळख असलेल्या, बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांचे राज्य आता खालसा झाले आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले, त्यात हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व असलेल्या वसई, नालासोपारा आणि बोईसर या तीन मतदारसंघांचाही समावेश आहे. यामुळे पालघरच्या निकालाने हितेंद्र ठाकूर यांचे राजकारण संकुचित केले का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
हितेंद्र ठाकूर, त्यांचे चिरंजीव क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटील या आमदारांना पराभूत का व्हावे लागले? त्यामागची कारणे काय? गेली ३०-३५ वर्षे निरंकुश सत्ता राबविणाऱ्या ठाकूर यांना यंदा तिहेरी धक्का का बसला? त्यांचे राजकारण चुकले का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. वसई-विरार महापालिकेच्या स्थापनेपासून हितेंद्र ठाकूर यांचे महापालिकेवर वर्चस्व राहिले होते. महापालिकेसह जिल्हा परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ठाकूर यांची एकहाती सत्ता असण्याचे दिवस आता संपले आहेत. एका अर्थाने त्यांची ‘ठाकूरशाही’च संपली असल्याचे संकेत या यावेळच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी दिले आहेत.
हितेंद्र ठाकूर यांचा प्रभाव असलेल्या तीनही विधानसभा मतदारसंघांत महायुतीतील भाजप आणि शिंदेसेनेच्या उमेदवारांना स्पष्ट बहुमत देत वसई-विरारकरांनी, तसेच तालुक्यातील नागरिकांनी ठाकूर यांच्या एकाधिकारशाहीला छेद दिला आहे. ठाकूर यांच्या पराभवाची आता जी काही कारणे दिली जात आहेत, त्यात मुलांप्रती असलेले अतीव प्रेम, कार्यकर्त्यांसोबतची तुटलेली नाळ, पावलोपावली पदाधिकाऱ्यांचा होणारा अपमान आणि शहरातील गेल्या अनेक वर्षांचे न सुटलेले प्रश्न आदींचा समावेश आहे. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीतच खरे तर ‘ठाकूरशाही’ संपेल, असे संकेत मिळाले होते. भाजपचे लोकसभेचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांना वसई, नालासोपारा, बोईसर भागात मोठे मताधिक्य मिळाले होते. भाजप जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत आघाडी घेतो आणि बहुजन विकास आघाडीचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला जातो, यातून हितेंद्र ठाकूर यांनी कोणताही बोध घेतला नाही.
येथे फक्त आमचेच चालणार, आम्हाला काहीच फरक पडणार नाही, अशीच नेहमी हितेंद्र ठाकूर यांची भाषा असायची. त्यातच त्यांचे जवळचे काही कार्यकर्ते दुखावले होते. विशेषत: त्यांच्या नात्यातीलच असलेले राजीव पाटील हेही दुखावलेले होते. ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, राजीव पाटील यांच्या आईने पुकारलेल्या असहकारामुळे त्यांना निर्णय बदलावा लागला होता; परंतु ते प्रचारादरम्यान फारसे सक्रिय असल्याचे दिसले नाही, तसेच निवडणुकीच्या आदल्या दिवशी भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांना पैसे वाटप प्रकरणात गोवण्याचा झालेला प्रयत्नही फारसा यशस्वी ठरला नाही. त्यातून बविआचा फायदा होण्याऐवजी नुकसानच झाल्याचे बोलले जात आहे.