लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : यंदा दि. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी राजपथावर महाराष्ट्राचे सांस्कृतिक प्रतिनिधित्व वसईतील विशाल ग्रुप करणार आहे. नृत्य उत्सव २०२१ रोजीच्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात व्हिडीओ राऊंड पार पडला होता त्यात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून एकूण ४० कला संघ सहभागी झाले होते. आणि अखेरीस या सर्व कला संघातून केवळ ५ संघ निवडण्यात आले आणि हे ५ संघ पुढे महाअंतिम फेरीसाठी देशाची राजधानी दिल्ली येथे पाठविण्यात आले होते. विशेष म्हणजे भारत देशाच्या विविध राज्यातून सहभागी ७० संघात महाअंतिम फेरी झाली.
यामधे वसईचा विशाल ग्रुप अव्वल ठरला आणि सर्वत्र कौतुकाचा वर्षांव झाला. दरम्यान विशाल ग्रुपच्या या यशाचे कौतुक वसईतील सामजिक संस्थानी ही केलं यात नायगाव स्थित जनसेवा फाऊंडेशन व लोकदरबार यांच्या सयुक्त विद्यमाने कौतुकाची थाप म्हणुन या ग्रुपला जनसेवा मानपञ प्रदान करून विशाल ग्रुपला नुकतेच गौरविण्यात आले.
अर्थातच महाराष्ट्राचे सांस्कृतिक प्रतिनिधीत्व आम्हां वसईच्या युवा कलाकारांना मिळणे हा आपल्या संपुर्ण वसईचा अभिमान आहे आणि जनसेवा फाऊंडेशनसारखी सामाजिक संस्था आमचा सन्मान करते हे भाग्य व बहुमान असल्याचे गौरवोद्गार विशाल ग्रुपचे प्रमुख रोशन घरत यांनी लोकमत शी बोलताना काढले इतकंच नाही तर याप्रसंगी लाखात भारी आमची यारी या अल्बमचे अनावरण देखील रविंद्र भाटकर सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.