लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : वसई-विरार शहरात काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची वाढ झपाट्याने होताना दिसत आहे. पालिका प्रशासन पुन्हा सज्ज झाले आहे. या वर्षी १० आणि ११ मार्चला वसई पूर्वेतील तुंगारेश्वर येथे होणारा महाशिवरात्री उत्सव सोहळा रद्द करण्याचा निर्णय देवस्थानकडून घेण्यात आला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेल्याने भाविकांनी या उत्सवासाठी येऊ नये, असे आवाहन तुंगारेश्वर महादेव देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांनी केले आहे. महाशिवरात्री उत्सवानिमित्त वसई-विरारसह संपूर्ण पालघर जिल्ह्यातून महादेव मंदिरात एक ते दीड लाख भाविक येत असतात. सध्या राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिरात गर्दी होऊ नये म्हणून देवस्थान विश्वस्त मंडळाकडून उपविभागीय अधिकारी वसई यांच्याकडून मार्गदर्शन मागितले. या बैठकीत उत्सव विश्वस्त लोकांच्या उपस्थितीत साधेपणाने साजरा करून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदा उत्सव रद्द करण्यात आला असल्याची माहिती देवस्थान समितीने दिली आहे.
दाेन दिवस मंदिरात भाविकांना प्रवेश नाहीकोरोनाचे सावट अजून पूर्ण संपलेले नसून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरू आहे. अद्याप लसीकरण पूर्ण झालेले नाही. यातच १० आणि ११ मार्चला महाशिवरात्री उत्सव होणार आहे. या सोहळ्याला भाविक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन गर्दी होऊ नये, यासाठी म्हणून दोन दिवस भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.