शौकत शेख
डहाणू : डहाणूच्या पश्चिम किनाऱ्यापट्टीवरील सुमारे ६० गावे, खेड्यापाड्यात काळोख पसरला आहे. महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या परिसरात दिवस-रात्र वीजेच्या तारा तुटणे, ट्रान्स्फॉर्मर फेल होणे, अर्ध्या-अर्ध्या तासाने फ्यूज, डिओ, झंपर उडत असल्याने तासभर देखील वीजपुरवठा सुरळीत रहात नाही. परिणामी, वीजेवर अवलंबून असलेले आणि या भागात घरोघरी चालणारे लघु उद्योग, डायमेकिंग व्यवसाय धोक्यात आले आहेत. चार महिन्यांपासून चिंचणी, वरोर, वानगाव फिडर तसेच बोईसर येथील १३२, १३३ के.व्ही.मध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने वीजेची अव्वाच्या सवा बिले पाठवून सक्तीने वसूल करणाºया वीज महावितरण कंपनीच्या विरोधात ग्रामस्थांमध्ये संताप आहे.
डहाणूच्या सुमद्र किनाºयावर वसलेल्या गाव-पाड्यात दिवसातून चार तास वीजपुरवठा खंडित होणे ही नित्याची बाब झाली आहे. तर रात्रीच्या सुमारास वाºयाची झुळूक आली तरी विजेच्या तारा तुटून पडतात. ग्रामस्थ एकत्र येऊन वायरमनला शोधून आणतात, आणि मग दोन - तीन तासांनी वीजपुरवठा सुरू होतो. परंतु रात्रभर डिओ, फ्यूज उडण्याचे सत्र सुरूच असते, विशेष म्हणजे फ्यूज किंवा डिओ टाकण्याचे काम येथील ग्रामस्थ जीव धोक्यात घालून स्वत:च करीत असतात. डहाणूच्या बंदरपट्टी भागातील गावात १९६४ मध्ये वीजपुरवठा सुरू झाला. परंतु गेल्या ५५ वर्षात या परिसरात काहीच खास बदल झालेला नाही. जीर्ण, जुनाट विद्युत खांब कमकुवत क्षमतेचा जनित्र, गंजलेल्या विद्युत तारा, गावातील उकिरड्यावर लटकलेले फ्यूज बॉक्स तसेच लोंबकळत असलेल्या विद्युत वाहिनीवरच महावितरण दिवस ढकलत आहे. गेल्या अनेक वर्षात या भागात सातत्याने मोर्चे, आंदोलन करून देखील महावितरण प्रशासन काही सुधारणा करीत नाही.प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीमे २०१८ च्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले खासदार राजेंद्र गावीत यांनी चिंचाणी येथील एका सभेत या परिसरातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी तीन ते चार कोटींचा निधी खर्च करून सुधारणा करण्यात येईल, असे सांगितले होते. परंतु अद्याप कोणतीच हालचाल होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.डहाणू पश्चिम किनारपट्टीवरील गावात काही ठिकाणी महावितरणची कामे सुरू आहेत. तर अनेक गावातील सुधारणा करण्यासाठी आम्ही पालघर जिल्हा नियोजन समितीकडे काही प्रस्ताव पाठविले आहेत. निश्चितच सुधारणा होऊन ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.-प्रताप मचिये,कार्यकारी अभियंता, पालघर महावितरण कंपनी