- लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वाढीव वीज बिलांमुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी शिवसेना आणि आरपीआयच्या वतीने विरारच्या महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालण्यात आला. मीटर रिंंडीग घेणाऱ्या अॅप सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने ग्राहकांना वाढीव बिलांचा फटका बसल्याची कबुली अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या काही महिन्यांपासून वसई तालुक्यात वीज ग्राहकांना वाढीव बिले येत आहेत. त्यामुळे दर आठवड्याला विविध भागात राजकीय नेते मोर्चे घेऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत आहेत. त्यातच मीटर रिंडीग घेणाऱ्या अॅप सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने वाढीव बिले येत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता यशवंत काकुळते यांनी मोर्चेकरांना दिल्यानंतर खरी माहिती चव्हाट्यावर आली आहे. वाढीव बिलाची समस्या सोडवण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही कार्यालय सुरु ठेवून ग्राहकांची कामे करू असे आश्वासन काकुळते यांनी दिल्यानंतर मोर्चेकरांनी आंदोलन मागे घेतले. विरारमधील झोपडपट्टीत राहणाऱ्या एका महिलेला चक्क पंधरा हजार रुपयांचे बिल आले आहे. ते पाहून त्या महिलेला हदयविकाराचा झटका आल्याची बाब मोर्चेकऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. शंभर दिडशेचे बील हजारावर गेले आहे. सध्या अनेकांची बिले तर पाच हजारांहून अधिकची आहेत. मात्र, हा गोंधळ अॅपमधील बिघाडामुळे झाल्याची कबुली देत अधिकाऱ्यांनी तो दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले.
महावितरणवर मोर्चा
By admin | Published: July 09, 2017 1:11 AM