वसई : वसई-विरार शहर महापालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या जुन्या योजनेची जलवहिनी पालघर धुकटन येथे बुधवारी गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले, तर पाणी वाया जाऊ नये यासाठी तिच्या दुरुस्तीचे काम युद्ध पाताळीवर चालू करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने ‘लोकमत’ला दिली.
वसई विरारला पाणीपुरवठा करणारी जुन्या योजनेची पाईपलाईन आता नादुरुस्त होऊन ती दुरुस्त होण्यासाठी अंदाजे १० ते १२ तास लागणार आहेत, म्हणजेच हे काम गुरुवारपर्यंत सुरू राहील अशी शक्यता आहे. परिणामी सूर्याच्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम लागलीच बुधवारी दुपारी १२ वाजता चालू करण्यात आले असून त्यावेळेपासून पुढील १० ते १२ तास सूर्या धरणातून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे, असेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता बुधवार दुपारनंतर व गुरुवारी काम पूर्ण होईपर्यंत शहराला होणारा पाणीपुरवठा बऱ्यापैकी बंद असेल.
दरम्यान, एव्हरशाईन, वसंतनगरी, नवघर पूर्व, रामदास नगर ,म.रा.वी.म. कॉलनी, विद्यामंदिर टाकीवरून होणारे साईनगर केटी वाडी, मीना नगर, मानवमंदिर, दिवाणमान, विशालनगर, शास्त्रीनगर, स्टेला मेरिविला, बीकेएस परिसर आदी भागात होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
एक दिवस पाणी नाहीपारोळ : ऐन उन्हाळ्यात वसईकरांना तीव्र पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी महापालिकेने ठरावीक विभागानुसार एक दिवस पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्याचे नियाेजन केले आहे. पालिकेची लोकसंख्या २२ लाखांच्या घरात पोहोचली आहे. वसई पूर्व, विरार पूर्व भागातील नागरिकांना आतापासून टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. उन्हाळ्याचे अजून दोन महिने शिल्लक आहेत. या काळात माेठी निकड भासू शकते. नजीकच्या काळात पाणीटंचाई तीव्र हाेणार असल्याने पाण्याच्या नियोजनासाठी हे पाऊल उचलले आहे.