वसई : वसई पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या जुन्या उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करणे गरजेचे असल्याचा वसईतील बांधकाम क्षेत्रातील जाणकारांचा मतप्रवाह आहे. जुना उड्डाणपूल बांधून जवळपास ४० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. नवीन उड्डाणपुलाच्या बांधणीनंतर जुन्या पुलावरील भारमान कमी झाले असले तरी आज हा पूल वाहतूक सेवेत कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर पुलाच्या व पुलावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.महाड येथील सावित्री नदी पूल दुर्घटनेनंतर राज्यातील जुन्या पुलांचा प्रश्न चर्चेत आला आहे. राज्य शासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व जुन्या पुलांच्या सुरक्षेला आता प्राधान्य दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर वसई पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या जुन्या उड्डाणपुलाकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याची गंभीर बाब निदर्शनास येत आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी या रेल्वे लाइनवर हा उड्डाणपूल बांधण्यात आला होता. त्यावेळचे वाहतूक भारमान व वाहतुकीला केंद्रित ठेवून या उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली होती. परंतु तेव्हाच्या व आताच्या वाहतूक भारमानात प्रचंड तफावत आहे. वसईची वाढती वाहतूक लक्षात घेऊन एमएमआरडीने जुन्या उड्डाणपुलाशी समांतर नव्या उड्डाणपुलाची निर्मिती केली आहे. (प्रतिनिधी)प्लास्टर तुटून पडले- सहा वर्षांपूर्वी जुन्या उड्डाणपुलाच्या पिलरचे अनेक ठिकाणचे प्लास्टर तुटून पडले होते. त्यावेळी प्रशासनाकडून पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर मात्र या पुलाकडे प्रशासनाने सातत्याने कानाडोळा केला आहे. - उड्डाणपुलाच्या खालून लोकल व लांब पल्ल्यांच्या गाड्यांची सतत वर्दळ सुरु असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने या पुलाचे तातडीने स्ट्रक्चरल आॅडिट करणे गरजचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
वसईच्या उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करा
By admin | Published: August 13, 2016 3:54 AM