पालघर : ‘एकच जिद्द, पाणेरी शुद्ध’, ‘लढेंगे - जितेंगे’ अशा घोषणा देत पाणेरी नदी प्रदूषणाविरोधातील माहीम ग्रामस्थांच्या तीव्र भावना जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चातून व्यक्त झाल्या. ह्यावेळी सर्व व्यवहार बंद ठेवून माहीमवासी या मोर्चात सहभागी झाले.
पालघरच्या डॉ. आंबेडकर चौकातून निघालेला हा मोर्चा हुतात्मा चौकात पोहोचल्यावर तेथे उपस्थित अन्य ग्रामस्थही मोर्चात सहभागी झाले. भुवनेश कीर्तने विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हुतात्मा चौकात पाणेरी प्रदूषणाबाबत पथनाट्य सादर करून याप्रश्नी पालघरवासीयांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. नंतर हुतात्मा चौकातून प्रदूषणाविरूद्ध घोषणा देत मात्र शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा पुढे निघाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अलीकडे पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर सरपंच दीपक करबट आणि सर्व सहकारी संस्थांच्या चेअरमननी मोर्चाला संबोधित केले. माहीममधील ९८ वर्षीय स्वातंत्र्यसैनिक जनार्दन तांबे यांनी मोर्चात सहभाग नोंदवीत स्वातंत्र्यापूर्वी अनेक लढे लढलो पण आताही लढे उभारावे लागत असल्याचे शल्य व्यक्त केले.सरपंच दीपक करबट, माहीम वि.का.स. संस्थेचे चेअरमन महेंद्र राऊत, वडराई मच्छीमार संस्थेचे चेअरमन रमेश मेहेर, वडराई ताडी माडीसह संस्थेचे चेअरमन विलास मोरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पूर्णिमा मेहेर, दत्ताराम करबट, मिलिंद म्हात्रे, दीपक भंडारी आणि सुजय मोरे आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन सादर केले. ग्रामस्थांनीही जागृत राहून त्याबाबत पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.