पालघर : बुलेट ट्रेनच्या जमीन अधिग्रहना बाबत पर्यावरण विषयक सल्लामसलतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकीत मनसे पालघर विभागाच्या कार्यकर्त्यांनी शिरून जोरदार घोषणाबाजी करीत बुलेट ट्रेन चे काम तात्काळ बंद करण्याची मागणी केली.वसई च्या चिमाजी अप्पा मैदानात मंगळवारी झालेल्या जाहीर विराट सभेत बुलेट ट्रेन, वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी, आदी प्रकल्पाला विरोध करीत बुलेट ट्रेनचे रूळ उखडून टाकण्याचे आदेश मनसे कार्यकर्त्यांना दिले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्पाचे संधर्भात पर्यावरण विषयक सल्लामसलतीची बैठक होणार असल्याची माहिती जिल्ह्यातील विनाशकारी प्रकल्पा विरोधात लढा देणार्या संघटनेचे रमाकांत पाटील यांनी बोईसरच्या भेटीत राज ठाकरे यांना दिले. त्यावेळी उपस्थित आपल्या कार्यकर्त्यांना या बैठकीत शिरून ही बैठक मनसे स्टाईलने उधळून लावण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने १२ वाजण्याच्या सुमारास बैठक सूरु असताना पालघर शहर प्रमुख सुनील राऊत, भावेश चुरी, जयंत वैती, विशाल जाधव, संदीप किणी आदी महाराष्टÑ सैनिकांनी या प्रकल्पाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत बैठक उधळून लावण्याचा प्रयत्न केला.जिल्हा निर्मिती नंतर चार वर्षांच्या कालावधीत शासनाने आम्हाला दिले काय? रोजगार, कुपोषण, ढासळलेली आरोग्य सेवा, पाणी टंचाई आदी समस्यांमध्ये जखडून आता बुलेट ट्रेन, वाढवण बंदर आदी विनाशकारी प्रकल्प राबवून आम्हाला उध्वस्त करण्याच्या घाट घातला जात आहे. हे कदापी सहन केले जाणार नसल्याचे शहर अध्यक्ष सुनील राऊत यांनी सांगून जोरदार घोषणाबाजी केली.या स्थानिकांच्या आंदोलनाला बळ देण्याचे काम मनसे यापुढे करणार असल्याचे भावेश चुरी यांनी जाहीर केले. यावेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बुलेट ट्रेनसाठीच्या अधिग्रहणाला मनसे विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 1:33 AM