अजित मांडके
ठाणे : भाजपाच्या नाराज २३ नगरसेवकांची मनधरणी करण्यात शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांना यश आले होते; परंतु आता त्या २३ पैकी २१ नगरसेवकांनी आमचे मनोमिलन झालेच नव्हते, असा दावा केल्याने युतीत खळबळ उडाली आहे. ज्या दोन नगरसेवकांचे मनोमिलन झाले, त्यांचीही कानउघाडणी शुक्रवारी नाराज २१ नगरसेवकांनी केली. त्यामुळे आता या २३ असंतुष्ट नगरसेवकांची फळी पुन्हा एकदा उभी राहिल्याने, युतीच्या मनोमिलनाचा डाव अवघा दोन घडीचाच ठरला आहे. शुक्रवारी या गटाने बैठक घेऊन, १ एप्रिल रोजी होणाऱ्या युतीच्या नगरसेवकांच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.
ठाणे लोकसभेसाठी शिवसेनेची उमेदवारी विद्यमान खासदार राजन विचारे यांनाच पुन्हा दिली जाणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपाच्या २३ नगरसेवकांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. विचारे यांच्याऐवजी दुसरा कोणताही उमेदवार दिल्यास त्यांच्यासाठी काम करण्याची आमची तयारी असल्याची भूमिका या नगरसेवकांनी घेतली होती. यामध्ये भाजपाचे गटनेते नारायण पवार, अशोक राऊळ, मिलिंद पाटणकर ही मंडळी आघाडीवर होती. त्यांनी २३ नगरसेवकांच्या सह्या असलेले पत्र थेट मुख्यमंत्र्यांना धाडले होते. त्यानंतर, शिवसेना विरुद्ध भाजपा असा वाद ठाणे लोकसभा मतदारसंघात निर्माण झाला होता. अखेर, मंगळवारी या वादावर पडदा पडला. शिवसेनेकडून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाकडून रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार, भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत भाजपाचे गटनेते नारायण पवार आणि अशोक राऊळ यांची समजूत काढण्यात आली. त्यामुळे युतीमध्ये मनोमिलन झाल्याचे चित्र निर्माण झाले होते; परंतु प्रत्यक्षात हे मनोमिलन केवळ दोनच नगरसेवकांचे होते, अशी भूमिका भाजपाच्या उर्वरित २१ नगरसेवकांनी घेतली. त्यानंतर, शुक्रवारी महापालिका मुख्यालयातील भाजपा गटनेत्यांच्या दालनात नाराज नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नारायण पवार यांच्यावर उर्वरित नगरसेवकांनी चांगलेच तोंडसुख घेतले. आम्ही तुमच्या भरवशावर आक्रमक भूमिका घेतली आणि तुम्हीच अशा प्रकारे नांगी टाकली, तेही आम्हाला विश्वासात न घेता, अशा शब्दांत त्यांनी पवार यांना धारेवर धरले. त्यामुळे झालेल्या प्रकाराची सारवासारव करण्याचा पवार यांनी प्रयत्न केला. पक्षश्रेष्ठींनी बोलावल्याने आम्हाला जाणे भाग होते. त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतला, तो मान्य करणेदेखील त्यावेळी आम्हाला आवश्यक होते; परंतु प्रत्यक्षात आजही आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्ही जी भूमिका घ्याल, ती आम्हाला मान्य असेल, असे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले. त्यांच्या शब्दामुळे नाराज नगरसेवक शांत झाले. याज बैठकीत पुढील दिशाही ठरवण्यात आली. दरम्यान, १ एप्रिल रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास सेना आणि भाजपाच्या सर्व नगरसेवकांची बैठक लावण्यात आली आहे.युतीतील वाद चिघळण्याची चिन्हेच्राजन विचारे यांच्या प्रचाराबाबत चर्चा करण्यासाठी १ एप्रिल ठाण्यात सेना आणि भाजपा नगरसेवकांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीच्या आधीच भाजपाच्या नगरसेवकांनी असहकार पुकारला आहे. शुक्रवारी झालेल्या नाराज भाजपा नगरसेवकांच्या बैठकीत, युतीच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही घेण्यात आल्याची माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली.च्राजन विचारे यांना आमचा विरोध राहणार असल्याचेही नाराज नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे. एकूणच मनोमिलनाचा डाव अवघा दोन घडीचाच ठरला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भाजपाच्या या नगरसेवकांनी अशी भूमिका घेऊन पक्षश्रेष्ठींना आव्हान दिले असल्याने येत्या काळात युतीमधील वाद आणखी चिघळणार असल्याचे दिसत आहे.सर्व नगरसेवकांची बैठक घेण्यात आली होती. यावेळी युतीच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. मी श्रेष्ठींपुढे काही बोलू शकलो नव्हतो. परंतु, नगरसेवकांनी घेतलेली भूमिका मला मान्य आहे. - नारायण पवार, गटनेते, भाजपा