ठाणे : माणकोली उड्डाणपुलाच्या उर्वरित कामासाठी एमएमआरडीएला अखेर मुहूर्त सापडला आहे. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या कामासाठी एमएमआरडीए आता ३९ कोटी १८ लाख ४८ हजार ५२३ कोटी रुपये खर्च करणार आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी त्यास सुरुवात करण्याच्या प्रयत्नात एमएमआरडीए आहे. हे काम सुरू झाल्यास मुंबई-नाशिकसह भिवंडी-कल्याण-डोंबिवली असा प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची दररोजच्या वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर २०१६ मध्ये याचे भूमीपूजन केले होते. मात्र, त्यानंतर भूमी संपादनासह इतर अनेक कामांमुळे हा पूल रखडला होता.
स्थानिकांच्या मोबदल्यासाठी होणारा विरोध आणि इतर अनेक कारणांमुळे या पुलाचे काम रखडले होते. नंतर, कंत्राटदार मे. सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.कडून हे काम एमएमआरडीएने काढून घेतले होते. तेव्हापासून हे केव्हा पूर्ण होईल, या प्रतीक्षेत स्थानिक लोकप्रतिनिधींसह वाहनचालक होते.
काम रखडल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात कोंडी होत होती. विशेषत: कल्याण-भिवंडीकर या कोंडीला पुरते वैतागले आहेत. त्याचे पडसाद एमएमआरडीएच्या बैठकीत अनेकदा उमटले आहेत. मात्र, पुलामुळे बाधित होणाºया डोंबिवली आणि भिवंडी या दोन शहरांतील शेतकºयांना वेगवेगळा मोबदला दिला जात असल्याचा आरोप करून भिवंडीमधील शेतकºयांनी जमिनी देण्यास विरोध केल्याने हा प्रश्न रेंगाळल्याचे कारण एमएमआरडीएकडून दिले जात होते.लोकसभा निवडणुकीपूर्वी घाईरखडलेल्या कामाचा फटका लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत बसू शकतो, ही शक्यता लक्षात घेऊन नव्या कंत्राटदाराच्या शोधासाठी एमएमआरडीएवर सत्ताधाºयांकडून सतत दबाव वाढत होता. अखेर, आता एमएमआरडीएने नव्या कंत्राटदाराच्या शोधासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून या कामावर ३९ कोटी १८ लाख ४८ हजार ५२३ रुपये खर्च होणार आहेत. काम सुरू झाल्यास लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत विरोधकांकडून होणारा संभाव्य विरोध आता मावळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वाहतूककोंडीतून होणार सुटका : माणकोली जंक्शनवरील उड्डाणपुलाचे काम रखडल्याने वाहनचालकांना दररोज वाहतूककोंडीला तोंड द्यावे लागत होते. विशेषत: भिवंडीच्या गोदामपट्ट्यात येणारी नवी मुंबईतील जेएनपीटीतील कंटेनर वाहतूक किंवा या गोदामातून मुंबई, ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, मीरा-भार्इंदर, कल्याण-डोंबिवली या शहरांत जाणारी अवजड वाहने दररोज या वाहतूककोंडीत अडकत होती. यामुळे वाहतूक पोलिसांची मोठी डोकेदुखी झाली होती. आता एमएमआरडीएने निविदा प्रक्रिया सुरू केल्याने काम सुरू झाल्यास चालकांची दररोजच्या कोंडीतून सुटका होईल.