प्रतीक ठाकूरलोकमत न्यूज नेटवर्क विरार : वसईतील कोरोनाचा वाढता धोका आणि गेल्या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर असंख्य तक्रारी व सूचना आल्यानंतर वसई-विरार शहर महापालिकेची निवडणूक आणखी लांबण्याची शक्यता आहे. २८ जून २०२० रोजी महापालिकेची मुदत संपली आहे. कोरोना महामारीमुळे आठ महिन्यांपासून महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडली आहे. सदोष प्रारूप मतदार याद्या, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि २९ गावांचे लटकलेले प्रकरण यामुळे पालिका निवडणुकीत मोठी विघ्ने आहेत. त्यामुळे पाच-सहा महिने तरी निवडणूक लांबवणीवर पडण्याची शक्यता राजकीय वर्तळात वर्तवली जात आहे.एप्रिलमध्ये वसई-विरार महापालिकेची निवडणूक संपन्न होणे अपेक्षित होते. त्यादृष्टीने मार्चच्या १५ तारखेपर्यंत आचारसंहिता लागणेही अपेक्षित होते. जानेवारी व फेब्रुवारीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे निवडणूक आयोगाने महापालिकेच्या निवडणुका घेण्याचे संकेत दिले होते. त्यासाठी प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना मागवल्या, परंतु मतदार यादीतील असंख्य चुका व घोळ लक्षात घेऊन नागरिकांनी हजारो हरकती नोंदवल्या. या हरकतीचा निपटारा करणे व मतदारयाद्या पुन्हा ठराविक वेळेत अद्ययावत करणे, ३ मार्चपर्यंत प्रसिद्ध करणे शक्य होणार नाही तसेच, काही दिवसांत कोरोनाच्या प्रादुर्भावाला पुन्हा वेग आल्यामुळे ही निवडणूक घेणे अशक्य आहे. त्यामुळे ही निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.वसई-विरारमधून कोरोनाचा आलेख झपाट्याने खाली आल्यानंतर वसई-विरार महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरूवात करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार १६ फेब्रुवारी २०२१ रोजी निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर पालिकेने प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. या प्रभागनिहाय मतदारयाद्यांवर हरकत व सूचना घेण्यासंदर्भात २३ फेब्रुवारी २०२१ ही तारीख देण्यात आली होती. निवडणूक पूर्व प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर मार्चच्या १५ तारखेपर्यंत आचारसंहिता जाहीर होऊन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीचा बार उडेल, अशी आशा होती. या सर्व शक्यतांवर कोरोनाच्या दुसरऱ्या लाटेने पुन्हा एकदा पाणी फेरले आहे. एप्रिलमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे पुन्हा गुंडाळण्याचीच शक्यता अधिक आहे. सध्या महापालिकेचे प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळणारे आयुक्त गंगाथरन डी. यांना प्रशासकपदी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता अधिक आहे. कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने राज्यातील तीन महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात. यासंदर्भात अद्याप घोषणा राज्य शासनाने केलेली नसली तरी एकूणच परिस्थिती पाहता निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वसई-विरार महापालिकेचा अर्थसंकल्प पुढील आठवड्यातnविरार : महापालिकेचा २०२१-२२ या वर्षाचा अर्थसंकल्प पुढील आठवड्यात सादर होण्याची शक्यता आहे. महापालिकेचा हा ११ वा अर्थसंकल्प आहे. या वेळचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त गंगाथरन डी. सादर करतील. अर्थसंकल्पात कोविड-१९ व अन्य आरोग्यसुविधांवर भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय कोविड-१९ मुळे रखडलेली विकासकामेही मार्गी लावण्यासाठी तरतूद असेल, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.nकोविड-१९ च्या सावटाखाली ४२ हजार ७२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प पार पडला होता. माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांनी हे अंदाजपत्रक सभागृहाला सादर केले होते. या अंदाजपत्रकात पाणी योजना, क्रीडा, दिव्यांगांसाठी विविध योजना आणि महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी योजनांना प्राधान्य देण्यात आले होते. देहरजी, सुसरी, सातिवली, राजवली, कामण, कवडसा बंधाऱ्यांची उंची वाढविण्यासाठी तरतूद केली होती. nआयुक्तांची प्रशासक म्हणून नेमणूक केली. पालिका कोराेनाचा प्रादुर्भाव रोखण्याकामी गुंतल्याने विकासकामेही रखडली होती. पालिकेची निवडणूक मार्च-एप्रिलमध्ये हाेण्याची शक्यता असताना काेराेनाचा पुन्हा प्रादुर्भाव आणि २९ गावे वगळण्यासंदर्भातील प्रश्न अनिर्णीत असल्याने यंदाचा अर्थसंकल्प महासभेच्या ठरावाविना होण्याची शक्यता आहे. ही विकासकामे मार्गी लावण्यासोबत आरोग्य सुविधांवर विशेष भर असेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.