शौकत शेख
डहाणू : मुंबईपासून १२० किमी अंतरावर असलेल्या डहाणू तालुक्यातील असंख्य खेड्यापाड्यांत अद्यापही इंटरनेट सुविधा नसल्याने येथील ग्रामस्थ सध्याच्या जगापासून, सोशल मीडियापासून दूरच आहेत. कोरानामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन होत आहे. मात्र डहाणूच्या दुर्गम भागात नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेता येत नाही. येथील आदिवासींना शैक्षणिकबरोबरच विविध शासकीय योजनेचे लाभ घेण्यासाठी ३० ते ४० किलोमीटर अंतरावर डहाणू शहरात येऊन अर्ज करावे लागतात. या खेड्यापाड्यांत नेटवर्कची सुविधा यावी, यासाठी प्रशासन उपाययोजना करीत नाही, अशी खंत ग्रामस्थ व्यक्त करतात.
डहाणू तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी आहेत. डहाणूतील मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या पलीकडील भागात काही गावपाड्यांत नेटवर्क नसल्याने मोबाइल कॉल लागत नाही. डहाणूपासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सायवन गावात गेल्या दोन वर्षांपासून इंटरनेट नेटवर्क सुविधा नाही. कासापासून १५ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. येथे परिसरातील आदिवासी दैनंदिन वस्तू खरेदी-विक्रीसाठी येतात. येथे ग्रामीण आरोग्य रुग्णालय, बँका, जिल्हा परिषद शाळा, पोलीस ठाणे, वनविभाग कार्यालय, ग्रामपंचायत आहे. परंतु नेटवर्कअभावी प्रशासकीय कामाचाही अनेकदा खोळंबा होतो.
सध्या प्रशासन सरकारच्या बहुसंख्य योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवत असते. या योजनांची येथील नागरिकांपर्यंत योग्य रीतीने माहिती पोहोचत नाही. त्यांचा गोंधळ उडतो. डहाणूच्या गंजाड, शेल्टी, वधना, रानशेत, साखरे, खुबाले, अवधानी, रायपूर इ. गावांत फोन लागत नसल्याने ग्रामस्थांना १०-१५ किलोमीटर अंतरावर जाऊन संपर्क साधावा लागतो. या गावपाड्यात नेटवर्कसाठी लवकर योग्य ती सोय करावी, अशी मागणी होत आहे.
आमच्याकडील भागात सातत्याने भूकंप होत आहे. मात्र आमचे फोन लागत नाहीत. या भागात एखादी घटना घडल्यावर प्रशासनाशी संपर्क साधायचा कसा? असा प्रश्न पडतो.- रामदास सुतार, खुबाळे, डहाणू