वाडा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीकरिता सकल मराठा समाजाने आज येथील खंडेश्वरी नाक्यावर सुमारे दोन तास महामार्ग रोखून धरून सरकारचे लक्ष वेधले.या रास्ता रोको आंदोलनामुळे लांबच लांब रांगा वाहनांच्या लागल्या होत्या.कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही ,एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे ; नाही कुणाच्या बापाचे, चर्चा नको ;कृती हवी, भीक नको; हक्क हवा हक्क हवा, उठ मराठ्या जागा हो ; आंदोलनाचा धागा हो अशा अनेक घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.सकाळी दहा वाजता सुरू करण्यात आलेले रास्ता रोको दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मागे घेतले गेले. दोन तास महामार्ग रोखून धरल्याने वाहनांच्या लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. भिवंडी मनोरकडे जाणारी वाहने खानिवली मागे वळवण्यात आली होती. वाडा तालुक्यातील तुसे, उचाट, शिंदेवाडी, कोळकेवाडी, वरले, खैरे, वारनोल, कोयनावसाहत, कुसवडे, आब्जे, निहंबे, वाडा शहर येथे मराठा समाज राहत असून आज कुटूबांसह मराठा समाज रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाला होता. लहान मुले, विद्यार्थी यांची संख्या लक्षणीय होती. लहान मुलांनेही भाषणातून आपला आक्र ोश व्यक्त केला. मराठा समाज मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाला होता. रास्ता रोको शांततेत पार पडले. कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस ठेवला होता. राजकीय पक्षांच्या बेड्या बाजुला ठेवून समाजासाठी एकत्र या असे आवाहन यावेळी करण्यात आले. या आवाहनाला टाळ्यांचा कडकडाटासह प्रतिसाद देण्यात आला. सरकारने लवकरात लवकर आरक्षण न दिल्यास पुढील काळात तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्याचा इशारा मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
वाड्यात मराठा समाजाने दोन तास रोखला महामार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 2:13 AM