वसई/पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये मराठी राजभाषा दिवस गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील विविध शाळा आणि सामाजिक संस्थांमध्ये मराठी राजभाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.वसईच्या संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे मराठी राजभाषा दिनाचे उत्तम आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी ‘कोपात’ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक रेमंड मच्याडो, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमनाथ विभुते, फादर डॉ. सोलोमन रॉड्रिग्ज, मराठी विभागप्रमुख प्रा. अंजली दशपुत्रे, डॉ. दिनेश काळे, प्रा. फेलिक्स डिसोझा आदी उपस्थित होते. सुरुवातीला पाहुण्यांचा परिचय शिल्पा यादव या विद्यार्थिनीने करून दिला आणि तद्नंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दशपुत्रे यांनी करताना मराठी राजभाषा दिन आपण का साजरा करतो, यामागची भूमिका स्पष्ट केली.डॉ.विभुते म्हणाले की, मराठी राजभाषा ही अतिशय समृद्ध अशी भाषा असून तिच्या बोलीभाषांचा गोडवा मनाला नक्कीच सुखावणारा आहे. तर मराठी साहित्य विपुल प्रमाणात आहे. विद्यार्थ्यांनी त्याचे नित्याने वाचन केले पाहिजे. सतत वाचन, मनन आणि चिंतनातून व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होत असतो.आपण अभ्यास करीत असलेल्या पुस्तकाचे लेखक जर प्रत्यक्षात आपल्या समोर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आले असतील तर ही खरोखरच मोठी भाग्याची गोष्ट आहे, असे सांगत ‘कोपात’कार रेमंड मच्याडो म्हणाले की, महाविद्यालयातील दिवस अत्यंत महत्त्वाचे असून या दिवसांचा जीवनाच्या उभारणीसाठी योग्य उपयोग केला पाहिजे व जीवनात सकारात्मक विचारातून संकटांशी दोन हात करण्याचे बळ मिळते असेही मच्याडो यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात मराठी राजभाषा दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 11:33 PM