पालघर/नंडोरे : दीड वर्षाच्या प्रतिक्षेनंतर पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली असून ३१ जुलै रोजी मतदान होणार आहे. तर १ आॅगस्टला मतमोजणी होणार आहे. आॅक्टोबर २०१३ मध्ये समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर समितीला दोनदा मुदत वाढ देण्यात आली होती. तदनंतर नोव्हेंबर २०१४ मध्ये भाजप-सेना सत्तेवर आल्यानंतर समिती बरखास्त होऊन तीवर प्रशासक नेमण्यात आला. या प्रशासक नेमणुकीनंतर सुमारे दीड वर्षांनी ही निवडणूक होत आहे. ३१ मे रोजी जिल्हा उपनिबंधकांनी समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ जून पर्यंत आहे. या अर्जाची छाननी १८ जून रोजी होणार असून ९ व १० जुलै रोजी अर्ज मागे घेता येणार आहे. ३१ जुलै रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार असून १ आॅगस्टला मतमोजणी होणार आहे. पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीवर पतसंस्था तसेच बहुउद्देशीय संस्थामधून ११ सदस्य, ग्रामपंचायतीमधून ४ सदस्य, व्यापारी व अडते मतदारसंघातून २ सदस्य तर हमाल व तोलाई मतदारसंघातून १ सदस्य असे १८ सदस्य निवडून द्यायचे आहेत. (वार्ताहर)
बाजार समितीची निवडणूक घोषित
By admin | Published: June 03, 2016 1:45 AM