जव्हार : गर्दी टाळण्याचे वारंवार आवाहन करूनही, नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंची सोय करूनही, बंदोबस्त कडक करून पोलिसांकडून नागरिकांना प्रसाद मिळूनही जिल्ह्यातील नागरिकांमध्ये काही सुधारणा होताना दिसत नाही. संकट आपल्याजवळ आले की, त्याची तीव्रता अधिक जाणवते, असे म्हणतात. पण, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही हळूहळू रुग्ण सापडत असताना नागरिकांमध्ये सतर्कता आलेली दिसत नाही. जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी जिल्ह्यात भरणाऱ्या बाजारांत उसळलेली नागरिकांची गर्दी पाहून याचाच प्रत्यय येतो आहे.लॉकडाउन तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम नागरिक पाळत नाहीत, म्हणून जव्हार प्रशासनाने शुक्रवार, २४ एप्रिलपासून शहरात नवीन नियम लागू करत आठवड्यातून तीनच दिवस जीवनावश्यक वस्तूंची बाजारपेठ सुरू राहील, असा आदेश पारित केला. मात्र, आठवड्याच्या पहिल्याच बुधवारी येथे ग्राहकांची तुडुंब गर्दी दिसून आली. परिणामी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र बघायला मिळाले. त्यामुळे जव्हारमध्ये हा तीन दिवसांच्या बाजारपेठेचा फॉर्म्युला फेल होताना दिसतो आहे.जव्हार हा अतिदुर्गम आदिवासी भाग असून तालुक्यात जवळपास एक लाख ४० हजार लोकसंख्या आहे. येथे जव्हार हीच मोठी बाजारपेठ असून शेकडो नागरिक बाजारपेठेत येत असतात. कोरोनाच्या या काळात जव्हारमधील दुकाने बुधवार, शुक्रवार आणि रविवार या तीन दिवशी सकाळी ७ ते दुपारी १.३० पर्यंत उघडी राहतील, असा आदेश होता. त्यानुसार, सलग पाच दिवस दुकाने बंद होती आणि त्याचा परिणाम बुधवारी थेट बाजारपेठेत दिसला. आधी सूचना देऊनही नागरिकांनी पाच दिवस पुरेल एवढे सामान घरात ठेवले नाही. किराणा, भाजीपाला, फळे, मटण-चिकन या दुकानांत गर्दी होती. दुकानांबाहेर लांबचलांब रांगा दिसत होत्या. मात्र, यात सोशल डिस्टन्सिंगचा नियम कुठेही पाळला गेला नाही.>जव्हारमधील बँकांत गर्दीच गर्दीजव्हार : शहरातील सर्वच बँकांमध्ये पैसे काढणाऱ्यांच्या बुधवार सकाळपासून रांगांच्या रांगा दिसत होत्या. शासनाने गरजूंच्या खात्यात ५०० रुपये अनुदान जमा केल्याने तालुक्यातील ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी एकच गर्दी केली. स्टेट बँकेच्या ग्राहकांची रांग एवढी मोठी होती की, नोटाबंदीच्या काळातही एवढी रांग दिसली नव्हती. बँकेकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. ग्राहकही त्याचे पालन करताना दिसत होते. स्टेट बँक ही तालुक्यातील लाखो ग्राहक असलेली एकमेव मोठी बँक असून हजारो ग्राहक दररोज बँकेत व्यवहारासाठी येतात. ही शाखा शहराच्या मध्यभागी असून ग्राहकांची रांग बँकेपासून राम मंदिर आणि तेथून मुख्य रस्त्याच्या पलीकडे बेंगलोर बेकरी, तेथून साई मंदिरमार्गे स्टेट बँक अशी २०० ते ३०० मीटर एवढी रांग बँकेबाहेर होती. अर्बन बँकेतही थेट ८० ते १०० मीटर लांब पाचबत्तीनाक्यापर्यंत गर्दी होती. महाराष्ट्र बँक, एचडीएफसी बँक, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक मेन शाखा आणि मोर्चा शाखा येथेही मोठी गर्दी होती. दरम्यान, नागरिकांनी एकाच वेळेस गर्दी करू नये, याबाबत प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.>विक्रमगडमध्ये आठवडाबाजार हाउसफुल्लकोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत असताना लोक याला न जुमानता बुधवारच्या आठवडाबाजारात गर्दी करत आहेत. किराणा दुकान, बँका असो किंवा भाजीपाला दुकान, दुधाची डेरी असो, सर्वच ठिकाणी जत्रेचे स्वरूप पाहावयास मिळाले. मात्र, यांना रोखण्यासाठी कोणताही प्रयत्न होत नसल्याची तक्रार मनसे तालुकाध्यक्ष परेश रोडगे यांनी केली आहे.पालघर, मनोर, त्र्यंबक, नाशिकमधील विक्रेते येथे दिसत होते. महाराष्टÑासह पालघर जिल्ह्यातही कोरोनाने थैमान घातले असताना वाडा तालुक्यातील वावेघर येथे डेंग्यूची लागण, ग्रामीण भागात सारीची साथ असे प्रकार घडत असतानाही बाजारात गर्दी होणे आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, ही गंभीर बाब आहे. यावर स्थानिक प्रशासनाने कडक पावले उचलली नाही, तर गंभीर परिणामांचा सामना करावा लागेल, असे चित्र सध्या विक्रमगडमध्ये दिसते आहे.>रमजानमुळे फळांच्या दुकानात गर्दी२५ एप्रिलपासून मुस्लिम धर्मीयांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली. त्याच दिवसापासून आठवड्यातून तीन दिवस दुकाने उघडी ठेवण्याचा नियम लावण्यात आला. रमजानमध्ये मुस्लिम बांधव रोजा (निर्जल उपवास) ठेवतात आणि सूर्यास्तानंतर फळे खाऊन रोजा सोडतात. त्यामुळे या महिन्यात फळांची विक्रीही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे फळांच्या दुकानांतही गर्दी झाली होती.सध्या लॉकडाउन सुरू आहे, त्यामुळे आम्हा रोजंदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात आठवड्याचा बाजार एकत्र कसा करणार? आम्ही रोज किराणा घेऊन कुटुंब चालवतो.मग, पाच दिवसांचा किराणा एकत्र कसा भरायचा, असा प्रश्न पडला आहे. यामुळे प्रशासनाने आठवडाभर दुकाने सुरू ठेवावीत, जेणेकरून आमच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही, अशी मागणी गरीब मजुरांनी केली आहे.
बाजार महत्त्वाचा, आजार नव्हे, मार्केटमध्ये तुडुंब गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 2:35 AM