लोकमत न्यूज नेटवर्क विक्रमगड : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून शहरासह ग्रामीण भागात नियम पाळले जात नसल्याचे चित्र आहे. तसेच बाजारपेठेत गर्दी केली जात असल्याने गावागावांत कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर विक्रमगड व्यापारी असोसिएशनने तातडीची बैठक घेऊन ३० एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन पाळत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणी सुरू केली आहे.विक्रमगड तालुक्यात एकूण १७० रुग्ण असून त्यापैकी ६५ रुग्ण नगरपंचायत हद्दीतील आहेत. शीळ येथे कमी प्रमाणात लक्षणे असलेले ३२ रुग्ण तर रिवेरा सेंटरमध्ये २४४ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी ९२ जण ऑक्सिजन रुग्ण आहेत. सद्य:स्थितीत मलवाडा, कुंर्झे व तलवाडा येथे लस देण्याचे काम चालू आहे, मात्र कोरोना व्हॅक्सिनचा साठा संपत आला असून एक दिवस पुरेल इतकी लस उपलब्ध असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांनी सांगितले.दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्याची मोठी गरज निर्माण झाली असून त्याप्रमाणे उपाययोजना केली जात असली तरी अनेक जण बेफिकीरपणे वावरत आहेत. चेहऱ्यावर मास्क नसणे, काम नसताना फिरणे, गर्दी करणे असे प्रकार दिसून येत आहेत. अशा लोकांवर पोलीस प्रशासन व नगरपंचायतीने कडक कारवाई करणे गरजेचे आहे.
शीळ येथील सेंटरमध्ये ३२ रुग्ण दाखल असून अजून ३५ रुग्णांना जागा उपलब्ध होऊ शकते. सद्य:स्थितीत मलवाडा, कुंर्झे व तलवाडा येथे लस देण्याचे काम चालू असून एक दिवस पुरेल एवढा साठा उपलब्ध आहे.- डॉ. श्रीकांत कुलकर्णी, आरोग्य अधिकारी, विक्रमगड
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता विक्रमगड व्यापारी असोसिएशनने ३० एप्रिलपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून नगरपंचायत लोकांमध्ये जनजागृती करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.- श्रीधर गालिपेल्ली, प्रभारी मुख्याधिकारी व तहसीलदार, विक्रमगड