विरार : वसई विरारमध्ये शुक्रवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. पाऊस अधून मधून थांबत असला तरी सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना अनेक ठिकाणी पाण्यामुळे अडथळे निर्माण झाले. विरार पश्चिमेकडील जुना विवा कॉलेज समोर गुडघ्या इतके पाणी साचले असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.एकीकडे पावसाच्या येण्याने ग्रामीण भागात आनंद आहे तर दुसरीकडे शहरी भागात जागो-जागी पाणी साचल्याने महानगरपालिकेने केलेली नाले सफाई चव्हाट्यावर आली. गालानगर, एमडी नगर, आचोळे, सेन्ट्रलपार्क, तुळींज पोलीस ठाणे, तुळींज रोड, टाकी रोड आदी सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे रिक्षा, मोटारसायकलींना पुढे जाता येत नव्हते. त्यातच पाणी शिरल्याने काही ठिकाणी वाहने नादुरुस्त झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.नागरिकांच्या रोजच्या रहदारीच्या स्टेशन जवळील मुख्य रस्त्यावरच गुढग्या इतके पाणीसाचल्यामुळे प्रवाश्यांचे प्रचंड हाल झाले. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे सकाळी कामानिमित्त निघालेल्या चाकरमान्यांना वाहतुकीच्या समस्येचाही सामना कारावा लागत आहे. कुठे रस्त्यावर पाणी साचले असल्यामुळे रिक्षावाले नेहमीच्या मार्गाने जाण्यास तयार होत नाहीत तर, कुठे पाण्याच्या पातळीमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यातच मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने अनेकांना कामाच्या ठिकाणी पोहचण्यास उशिर झाला. नालासोपारा पूर्वेकडील स्टेशन परिसरात गुडघाभर पाणी साचले होते. सेंट्रलपार्क, तुळींज रोड, विजय नगर येथे तर अक्षरश: रस्त्यांना नदीचं स्वरूप आले होते.तारापूर - बोईसर परिसरात पहाटे पासून अवघ्या सहा तासात सुमारे २०० मि. मी. पाऊस पडून पावसाने दमदार आगमन केले मात्र, पहिल्याच पावसात नागरीवस्त्या, चाळी व एमआयडीसी सह सर्वत्र पाणी साचून काही रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्याच बरोबर सर्वत्र वीज गुल झाल्याने महावितरण विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला
वसई-विरारमध्ये मुसळधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 11:48 PM