पारोळ : वसईची ऐतिहासिक ओळख देणारा व हजारो मराठा सैनिकांच्या रक्ताने रंजित झालेल्या व त्यांच्या पराक्र माची साक्ष असणाऱ्या ऐतिहासिक व केंद्र सरकारद्वारे संरक्षित अशा वसईच्या किल्ल्याचे पावित्र्य या नववर्षारंभदिनी व त्याच्या पूर्वसंध्येस राखण्यात आपली वसईच्या मावळ्यांना यश आले आहे. याच किल्ल्यात युरोपीय सत्तेविरुध्द भारताने पहिला विजय मिळवला होता. असा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आपल्या वसई किल्ल्यात इंग्रजी नववर्षानिमित्त ३१ डिसेंबरला दरवर्षी असंख्य व्यक्ती मद्यप्राशन करून त्याचे पावित्र्य भंग करीत असत. न्यायालय, पंचायत समिती कार्यालय, दंडाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन व राज्य उत्पादन शुल्क कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वसई किल्ल्यात वर्षभरही हे प्रकार चालत असत. अनेक दशकांपासून सज्जन नागरिकांमध्ये याविषयी संताप व खेद व्यक्त होत होता. पण कोणत्याही शासकीय विभागातर्फे ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नव्हते. पण यंदा टीम ‘आमची वसई’ या सामाजिक समूहाने वसईचे वैभव असलेला किल्ला मद्य-व्यसन-अनैतिक प्रकारांपासून मुक्त करण्याचा विडा उचलला.३१ डिसेंबर, २०१६ रोजी टीम आमची वसई ने भारतीय पुरातत्व विभाग व पालघर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने वसई किल्ल्यात जागता पहारा दिला. किल्ल्यात सायंकाळी ६ नंतर सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात आला. १०६ चारचाकी व १२३ दुचाकी वाहनांना परत पाठवण्यात आले. अनेक वाहनांमध्ये पोलिसांना व पुरातत्त्व खात्यास मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. एक दोन व्यक्तींनी राजकीय व प्रशासकीय ओळख दाखवत अरेरावी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना योग्य समज देऊन घराचा रस्ता दाखवण्यात आला. आमची वसई ने पुढाकार घेऊन राबवलेल्या या मोहिमेचे महाराष्ट्रभर कौतुक होत आहे. जनमानसात समाधानाचे वातावरण आहे. किल्ल्याचे महत्त्व सांगितल्यावर व प्रबोधनानंतर अनेक युवक युवतींनी यापुढे किल्ल्यात अनैतिक प्रकार करणार नाही व करू देणार नाही असा निर्णय घेतला आहे. मद्यपान व अनैतिक प्रकार कायमस्वरूपी बंद कसे करण्यात येतील यासंबंधी वसई पोलीस व पुरातत्व विभागाने उपाय योजना करण्यास सुरु वात केली आहे. यापुढे किल्ल्यात अवैध मद्य वाहतूक, मद्यपान, अश्लील चाळे व अनैतिक प्रकारांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.(वार्ताहर)
वसईच्या किल्ल्याचे राखले मावळ्यांनी पावित्र्य
By admin | Published: January 02, 2017 3:37 AM