मीरारोड- गुजरात वरून नियमित येणाऱ्या प्रवासी लक्झरी बस मधून आणला जाणारा २० गोणी मावा काशीगाव पोलिसांनी जप्त केला आहे. त्यातील काही मावा तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाने घेतला असून उर्वरित मावा हा नष्ट केला आहे. तर बस मधून मोठ्या प्रमाणात मावा आदी ऐन सणासुदीच्या दिवसात बाहेरून आणला जात असल्याचे या प्रकाराने उघड झाले आहे.
गुजरात कडून येणाऱ्या दोन लक्झरी बस मधून भेसळयुक्त मावा आणला जात असल्याची माहिती काशीगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक माणिक पाटील यांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस पथकाने मंगळवारी सकाळी महामार्गावरील काशीमीरा उड्डाण पूल सुरु होण्या आधी लक्ष्मीबाग येथे दोन बस मधून २० किलो मावा जप्त केला. सदर मावा गुजरात वरून बस मधून आणला जात होता असे संबंधित इसमाच्या चौकशीत समोर आले. याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आल्या नंतर अन्न प्रशासनाच्या सहायक आयुक्त धनश्री ढाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी भरत वसावे यांनी माव्याचे नमुने तपासासाठी घेतले असून उर्वरित मावा हा नष्ट केला. माव्याच्या तपासणीचा अहवाल आल्या नंतर संबंधित यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.