नालासोपारा : एका कॉलेजच्या मैदानात एमडी ड्रग्ज विकणाऱ्या दोन आरोपींना विरार पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करत मुद्देमाल हस्तगत केला आहे.
विरार पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ओल्ड विवा कॉलेजजवळच्या मैदानात दोन आरोपी एमडी ड्रग्ज (मेथॅडॉन) नावाचा अमलीपदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहेत. पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना याबाबत अवगत करून पोलिस निरीक्षक (गुन्हे) दिलीप राख व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी विरार येथील ओल्ड विवा कॉलेजजवळच्या मैदानात सापळा रचला.
या ठिकाणावरून ओमकार रामचंद्र तुळसकर आणि मोनिश वसीम बेग या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांंच्याकडून १० हजार ८०० रुपये किमतीचे अंदाजे ९.५५० ग्रॅम वजनाचे पांढऱ्या व लालसर रंगाचे लहान-लहान दाणे (साखरे सारखे दिसणारे) एमडी ड्रग्ज अमलीपदार्थ जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलिस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलिस आयुक्त रामचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विरारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) दिलीप राख, गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिस उपनिरीक्षक संदेश राणे, हवालदार सचिन लोखंडे, संदीप जाधव, इंद्रनील पाटील, विशाल लोहार, संदीप शेरमाळे, योगेश नागरे, मोहसिन दिवाण, बालाजी गायकवाड, रोशन पूरकर, दत्तात्रय जाधव यांनी केली आहे.