लोकमत न्यूज नेटवर्क,
नालासोपारा (मंगेश कराळे) :- गस्ती दरम्यान तुळींज पोलिसांना एका बॅगमध्ये २ कोटी २० लाख रुपये किंमतीचे मेफेड्रोन अंमली पदार्थ सापडल्याने नालासोपारा शहरात खळबळ माजली आहे. तुळींज पोलिसांनी बॅगमध्ये सापडलेल्या पासपोर्टच्या आधारे पळून गेलेल्या नायजेरियन आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
बुधवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तुळींजचे पोलीस अंमलदार पांडुरंग सगळे हे बिट मार्शल गस्त घालत होते. त्यावेळी एक नायजेरियन नागरिक संशयास्पद बॅग घेऊन चालताना दिसला. त्यांना संशय आल्याने नायजेरियन नागरिकाला हटकल्यावर त्याने बॅग रस्त्यात फेकून रेल्वे पटरीकडे पळून गेला. सगळे यांनी बॅगची झडती घेतल्यावर त्यात २ करोड २० लाख ४० हजार रुपये किंमतीचे १ किलो १०२ ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन अंमली पदार्थ मिळून आले. तसेच त्या बॅगेत ऍनिबुनवा लुईस (४४) याचा पासपोर्ट, ३ मोबाईल आणि वजन काटा सापडला आहे. तुळींज पोलिसांनी ३ मोबाईल, वजन काटा व अंमली पदार्थ असा एकूण २ करोड २० लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तुळींज पोलिसांनी आरोपी विरोधात एनडीपीएस ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. पासपोर्टवरील नावाच्या नायजेरियन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत तपास करत असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी लोकमतला सांगितले.
नायजेरियन नागरिकांचा अड्डा
नालासोपारा शहराच्या पूर्व परिसरातील प्रगती नगर येथे मोठ्या प्रमाणात नायजेरियन लोकांचा जणू अड्डाच बनला आहे. तुळींज पोलीस ठाण्याच्या अंतर्गत अंदाजे शेकडो नायजेरियन लोक राहत असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. पोलीस प्रशासन यांच्यावर वेळीच कारवाई करत नसल्यामुळे यांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत असल्याचीही चर्चा सामान्य नागरिकांमध्ये होत आहे. जर वेळीच नायजेरियन यांच्याविरोधात पोलिसांनी कडक कारवाई केली नाही तर भविष्यात हे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरतील.