नालासोपारा : विरार पश्चिमेकडील यशवंतनगरजवळील म्हाडा कॉलनी-मधील २४ मजल्यांच्या इमारतीमध्ये म्हाडाने तब्बल १८६ पोलिसांना राखीव घरे ठेवली होती. पण या कार्यक्रमाला गेल्या दोन वर्षांपासून मुहूर्त मिळत नसल्याने पोलिसांना घरे मिळाली नव्हती. अखेर पालघर पोलीस दलातील १०९ कर्मचाऱ्यांना म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे विरार बोळिंज येथे उभारलेल्या गृहनिर्माण योजनेतील इमारत क्रमांक १० मधील सदनिकांचे वाटप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते बुधवारी दुपारी करण्यात आले.गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्या ए-३ या शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाला कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. नितीन महाजन, आयुक्तालयाचे प्रतिनिधी सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव, म्हाडाचे वित्त नियंत्रक विकास देसाई, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके व अन्य अधिकारी उपस्थित होते.यावेळी गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्या हस्ते सदनिका निश्चित झालेल्या पालघर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी प्रवीण आव्हाड, जागृती मेहेर, रुक्मिणी राठोड, अदिती सरनोबत, फिरोझ तडवी यांना सदनिकेचे प्रथम सूचनापत्रही प्रदान करण्यात आले. कोंकण मंडळातर्फे उर्वरित सदनिका लाभार्थीना लवकरच प्रथम सूचनापत्र पाठविली जाणार आहेत.म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे विरार बोळींज येथे सुमारे ११९ एकर जमिनीवर गृहनिर्माण योजना विकसित करण्यात आली आहे. या योजनेतील टप्पा-३ मधील इमारत क्रमांक १० मधील १८६ सदनिका पालघर पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना वितरित करण्यास महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या ४ जानेवारी २०१९ रोजीच्या ठराव क्रमांक ६८०९ अन्वये मान्यता देण्यात आली आहे. १८६ सदनिकांसाठी पालघर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविण्याकरिता मार्च २०१९ मध्ये जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार पालघर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याकडून १०९ अर्जदारांच्या नावांची यादी पाठविण्यात आली होती. दरम्यान, म्हाडाकडून घरे भेटली, पण त्याची प्रक्रिया किचकट असून २० ते २५ कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. ही कागदपत्रे असतील तरच पात्र की अपात्र ठरवूनच घरे देण्यात येणार असल्याचे एका पोलीस कर्मचाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.
पालघरमधील १०९ पोलिसांना विरार-बोळिंज येथे म्हाडाची घरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 1:30 AM