लोकमत न्यूज नेटवर्कवसई : बॅसीन कॅथॉलिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि वसई शहर काँग्रेसचे अध्यक्ष मायकल फुर्ट्याडो (६१) यांचे आज संध्याकाळी मुंबईतील खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात माजी नगरसेविका पत्नी बिना फुर्ट्याडो, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे. गेल्या आठ दिवसांपासून मृत्युशी झुंज देत असलेल्या फुर्ट्याडो यांची प्राणज्योत संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास मावळली. तत्कालीन वसई नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद भूषवलेल्या फुर्ट्याडो यांनी वसईच्या राजकीय, सामाजिक शिक्षण, आरोग्य, सहकार आदी अनेक क्षेत्रात योगदान दिले आहे. बॅसीन कॅथॉलिक बँकेचे ते अनेक वर्षांपासून संचालक होते. बँकेचे अध्यक्षपद पूर्वीही भूषवलेल्या फुर्ट्याडो यांना बँकेच्या शंभराव्या वर्षी पुन्हा अध्यक्षपद भूषवण्याचा मानही यांना मिळाला होता. वसई तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्षपदावरही त्यांनी काम केले होते. सध्या ते वसई शहर काँग्रेसचे अध्यक्ष होते. तत्कालीन वसई नगरपरिषदेचे ते अनेक वर्षे नगरसेवकही होते. नगराध्यक्षपदासह आरोग्य समिती सभापती म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून पालिकेच्या सर डी. एम. पेटीट रुग्णालयाचा कायापालट केला होता. बंगली येथील कार्डीनल ग्रेशस हॉस्पीटलचे ते विश्वस्त होते. सिडको, वसई विरार महापालिकेविरोधातील लढ्यात फुर्ट्याडो यांनी पुढाकार घेतला होता. महापालिकेविरोधात स्थापन झालेल्या जनआंदोलन समितीचे उमेदवार विवेक पंडित यांना वसई विधानसभा मतदारसंघातून निवडून आणण्यात फुर्ट्याडो यांचा मोलाचा वाटा होता. आज अंत्यसंस्कारफुर्ट्याडो यांच्या पार्थिवावर रविवारी संध्याकाळी पाच वाजता पापडी येथील चर्चमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. २५ जूनला सकाळी कृपामाता हॉलमध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
मायकल फुर्ट्याडो यांचे निधन
By admin | Published: June 18, 2017 1:59 AM