तलासरी : तलासरी आणि डहाणू तालुक्यातील काही भागात गेल्या दोन तीन महिन्यापासून गूढ आवाज येत असल्याच्या तक्रारी होत्या. दरम्यान, शनिवारी दुपारी झालेल्या भूकंपाच्या हादऱ्याने त्याची शासनाला नोंद घ्यावी लागली असून स्थानिकांनी स्थलांतर करण्यास सुरु वात केली आहे. तर येथील हळदपाड्यातील ग्रामस्थ घरात न राहता, त्यांनी शेतातच तळ ठोकला आहे.
२४ नोव्हेंबर रोजी डहाणू व तलासरी भागात दुपारपासून भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत. त्यातील दुपारी ३.१५ वाजता बसलेला धक्का हा ३.३ मॅग्निट्युडचा आहे. पालघर जिल्ह्यात साधारणत: ६ मॅग्निट्युडचा धक्का बसल्यास काळजी करण्याचे कारण असेल. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन आपत्ती निवारण विभागाकडून केले आहे.
भूकंपाच्या अनुषंगाने कोणती काळजी घ्यावी याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांच्यामार्फत २६ नोव्हेंबर पासून प्रशिक्षण कार्यक्र म आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणसाठी नियुक्त केलेले अनिल गणपत गावित, काशीनाथ रडका कुरकुटे, सहाय्यक उपनियंत्रक, नागरी संरक्षक दल तारापूर यांनी सोमवारी धुंदलवाडी, हळदपाडा, वेदांत रुग्णालय येथे ग्रामस्थांना माहिती देऊन जनजागृती केली दिली. धुंदलवाडी गावातील मुंबईपाड्यातील ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे पण ते कुणीकडे गेले त्याची माहिती कोणालाही नाही. या पाड्यातील सर्व घरांना कुलूपे लावलेली आहेत. मुंबईपाडा घरेदारे सोडून स्थलांतर झाल्याने त्यांच्या घरांची चिंता निर्माण झाली त्याचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने येथे सुुरक्षेचा प्रश्न निर्मिण झाला आहे.