वाडा : जव्हार, मोखाडा, खोडाळा, डहाणू, तलासरी, विक्रमगड, वाडा तालुक्यातील काही दुर्गम भागातील आदिवासी मजुरांसाठी गावपातळीवर रोजगाराची संधी उपलब्ध नसल्याने त्यांना रोजगारासाठी शहराकडे स्थलांतरित व्हावे लागते आहे.
गाव आणि परिसरातील भात शेतीची कामे आता संपली असल्याने गावात रोजगार मिळणे कठीण झाले आहे. पण मुळाबाळांचे संगोपन करण्यासाठी मजूरी हा एकमेव पर्याय आदिवासींसमोर असल्याने कामाच्या शोधात मजुरांनी स्थलांतर सुरू केले आहे. दिवाळीच्या आधी आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर मजुरांना गावात काम मिळत असते. पावसाळ्याच्या पाण्यातील मासे, जंगलातील रानभाज्या विकून आदिवासी मजूर काही दिवस स्वतंत्र व्यवसाय करतात. चिंबोरी, खेकडे विकणे ही आदिवासीची रोजीरोटी आहे.
भात लागवड, भात कापणीवेळी सुद्धा शेतीमध्ये घाम गाळून आदिवासी मजूर रोजीरोटी कमावतात. मात्र, या मोसमात या मजुरांना काम शोधण्यासाठी भटकंती करावी लागते. हाताला जे काम मिळेल ते करण्यापलीकडे या मजुरांनकडे पर्याय नसतो. कुटुंबाचे आणि मुलाबाळांचे संगोपन करण्यासाठी तसेच पैसा कमावण्यासाठी मजुरांचे तांडे कुडूस नाका आणि आसपासच्या गावात स्थलांतरित झालेले दिसत आहेत. तर मजूर कामाच्या शोधात अन्य ठिकाणी स्थलांतरित झाल्याने आदिवासी पाडे ओस पडले आहेत.
मुलाबाळांचे संगोपन, शिक्षण व्हावे, दोन पैसे मिळावेत म्हणून रोजगाराच्या शोधात स्थलांतरित व्हावे लागते.- संतोष दळवी, न्याहाळा (जव्हार)