n लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेत सध्या पालिकेच्या जागेवर प्रवेशद्वाराची कमान बनवण्याच्या कामांची धूम सुरू आहे. अगदी मलनिस्सारण केंद्रापासून रुग्णालयही पालिका आणि सत्ताधारी नगरसेवकांनी सोडलेले नाही. कमानीसाठी तब्बल १५ ते २५ लाखांची उधळपट्टी सुरू असून अनावश्यक कमानींवर पैशांचा चुराडा करण्याऐवजी नागरिकांना चांगल्या सुविधा द्या, असा संताप व्यक्त हाेत आहे.
पालिकेचा वादग्रस्त सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरसेवकांचे असलेले साटेलोटे पुन्हा कमानीच्या निमित्ताने चव्हाट्यावर आले आहे. शहरात नगरसेवक निधीसह जनरल फंडातून कमानी उभारण्याची कामे सुरू आहेत. मीरा रोड येथील भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय इमारतीला दोन ठिकाणी कमानी प्रवेशद्वार बांधले जात आहेत. रुग्णालय वा इमारतीत दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाचे वाहन जाण्यासही अडथळा होणार आहे. रुग्णालयात आवश्यक सुविधा दिल्या जात नसताना कमानी उभारण्यावर लाखोंचा खर्च केला जात आहे.
मीरा रोड येथील पालिका मलनिस्सारण केंद्रातही दोन ठिकाणी प्रवेशद्वार कमानी बांधण्यात आल्या आहेत. मलनिस्सारण प्रकल्पच बंद असताना कामानींवर लाखोंचा खर्च करून काय साध्य होणार, असा प्रश्न नागरिक करीत आहेत. पालिकेच्या एका नर्सरीला लाखो रुपये खर्च करून कमान बनविण्यात आली. मात्र त्यात काही हजार रुपयांची मोटार मशीन बंद असताना त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष आहे. असाच प्रकार जॉगर्स पार्कच्या कमानीबाबत आहे. येथेही दोन कमानी उभारल्या आहेत. या प्रकरणी पालिका शहर अभियंता शिवाजी बारकुंड व कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन न घेतल्याने त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.
शहरातील सत्ताधारी भाजपला जनतेच्या हिताची कामे करण्यापेक्षा नको त्या ठिकाणी वायफळ खर्च करण्यात जास्त रस दिसत आहे आणि यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे.- प्रमोद सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष