लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड - पावसाळा सुरु झाल्या पासून सातत्याने खड्डयां मुळे त्रासलेल्या नागरिकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पावले . फडणवीस येणार असल्याने त्यांच्या आगमन मार्गावरील खड्डे युद्धपातळीवर बुजवण्यात आले .शुक्रवारी रात्री फडणवीस यांनी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला .
भाईंदरच्या उत्तन केशव सृष्टी येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मध्ये सुरु असलेली मुंबईतील आमदार - खासदारांच्या शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी शुक्रवारी फडणवीस हे शहरात आले होते . फडणवीस येणार असल्याने दहिसर चेकनाका पासून काशीमीरा नाका पर्यंतच्या महामार्गवर तसेच तेथून थेट उत्तन पर्यंतच्या रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे महापालिका आणि एमएमआरडीएच्या मेट्रो ठेकेदाराने युद्धपातळीवर बुजवण्यास घेतले होते.
संपूर्ण रस्ता स्वच्छ चकाचक करण्यात आला होता . नाक्या नाक्यावर वाहतूक पोलीस व स्थानिक पोलीस तैनात होते . त्यामुळे मंत्र्यांनी नियमितपणे शहरास भेट दयावी अशी टिप्पणी नागरिकांसह राजकीय स्तरावरून केली हात आहे . पोलीस आयुक्त सदानंद दाते , महापालिका आयुक्त दिलीप ढोले तसेच अधिकारी आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष ऍड रवी व्यास , माजी जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे , महिला जिल्हाध्यक्षा रिना मेहता आदींनी फडणवीस यांचे उत्तन येथे स्वागत केले .
पोलीस आयुक्तालयाच्या कामाचा आढावा उत्तन येथील कार्यक्रम आटपून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस यांनी रात्री मीरारोड येथील पोलीस आयुक्तालयास भेट दिली . आयुक्त दाते यांच्यासह अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक , उपायुक्त विजयकांत सागर , अमित काळे , संजयकुमार पाटील व प्रशांत वाघुंडे आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते .
यावेळी फडणवीस यांनी आयुक्तालयाच्या एकूणच कामकाजाचा आढवा घेतला . आयुक्तालयाने राबवलेले विविध उपक्रम व गुन्हे यांची उकल आदी बाबतीत पोलिसांचे कौतुक केले . पोलीस आयुक्तालयासाठी हवे असलेले मनुष्यबळ , मुख्यालयाचे काम , आवश्यक कामांसाठी लागणारा निधी आदींची माहिती घेऊन शासना कडून लवकरात लवकर त्याची पूर्तता करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले .यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण सुद्धा सोबत होते .