पालघर : मागील ९ वर्षांपासून सफाळे भागासाठी कार्यान्वित असलेली परंतु समस्याग्रस्त बनलेल्या उंबरपाडा-नंदाडे व १७ गावे नळपाणीपुरवठा योजनेला नवसंजीवनी मिळवून देण्यासाठी विश्वास फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील जिल्ह्यातील पाण्याच्या अनेक योजनांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी येत असून सफाळेवासीयांच्या पाणी प्रश्नावर सकारात्मक उपाययोजना आखली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ.विश्वास वळवी यांनी दिली.करवाळे धरणातून उंबरपाडा-नंदाडे व १७ गावे प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेंतर्गत उंबरपाडा-नंदाडे, सफाळे, सरतोंडी, कर्दळ, कपासे, माकणे, मांडे, वेढी, मांजुर्ली, विराथन खुर्द, विराथन बुद्रुक, नवघर, करवाळे, विठ्ठलवाडी, जलसार, टेंभी खोडावे, वाढीव, सरावली, मिठागर आदी गावांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून एप्रिल २००५ मध्ये कार्यान्वित झालेली ही नळपाणीपुरवठा योजना अनेक वर्षांपासून हेलकावे खात असून टेम्भी खोडावेसारख्या शेवटच्या टोकावरील अनेक गावांत आजही पुरेसे पाणी पोचले नसल्याने लोकांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की येत होती. सफाळे हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने वाढते नागरिकीकरण आणि परिसरातील पर्यटनस्थळे पाहता करवाळे धरणात वांद्री धरणातून पाणी आणणे गरजेचे बनले आहे. जलशुद्धीकरण केंद्र तातडीने उभारणे आणि राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाच्या २०१३-१४ च्या कृती आराखड्यात खास बाब म्हणून या योजनेचा समावेश करून सुधारित योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करणे आवश्यक असल्याचे विश्वास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विश्वास वळवी यांनी संपर्कप्रमुख आ. रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. या वेळी वाढीवचे शाखाप्रमुख हर्षद पाटील,जलसारचे सरपंच गणेश भोईर आदी उपस्थित होते.
पाण्याच्या योजनांचा मंत्री घेणार आढावा, गुलाबराव पाटलांचा सोमवारी दौरा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2020 11:25 PM