वसई: वसई-विरार शहर महापालिकेच्या नगररचना विभागाचे वादग्रस्त प्रभारी उपसंचालक संजय जगताप यांच्यावर संचालक, नगरपालिका प्रशासन यांच्या कार्यालयाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पालघर जिल्हाधिकारी तथा प्रभारी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी लोकमतला दिली.
उपसंचालक असलेल्या संजय जगताप यांची काही महिन्यापूर्वीच वसई-विरार शहर महापालिकेतून अन्यत्र बदली करण्यात आली होती, तर विशेष म्हणजे या बदली आदेशात बदलीच्या ठिकाणी तातडीने रुजू व्हावं अथवा बदली थांबण्यासाठी कुठलाही दबाव आणू नये असे स्पष्ट लेखी निर्देश देण्यात आले होते, एकुणच या विभाग स्थापनेपासूनच जगताप यांना हा विभाग वादग्रस्त ठरला होता.
तरी येथे नव्या बांधकामांना परवानगी देताना विकासकांकडून प्रतिचौरस फूटामागे विशिष्ट अतिरिक्त "झेड फंड" हा बेकायदेशीरपणे वसूल केला जात असल्याचा गंभीर आरोप यापूर्वी पोटनिवडणुक व विधानसभा -2019 च्या निवडणूकामध्ये झाला होता.
त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख तथा सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणूक प्रचारात हा मुद्दा बऱ्यापैकी उचलून धरला होता. तर याच कळीच्या मुद्द्यावरून मागील महिन्यात वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात लढवलेल्या सेना उमेदवार विजय पाटील यांच्यात एका शैक्षणिक कार्यक्रमात शाब्दिक चकमक देखील उडाली होती.
दरम्यान नगरपालिका संचलन कार्यालयाने निलंबनाची कारवाई केलेले संजय जगताप यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी निलंबनाच्या कारवाईला दुजोरा दिला असून मात्र ही कारवाई करताना आपल्याला कुठल्याही प्रकारची आगाऊ नोटीस बजावण्यात आली नाही किंवा आपलं म्हणणं मांडण्याची संधी देखील देण्यात आली नाही असे म्हंटल आहे.
दरम्यान प्रशासकीय कायद्यातील सेवा नियमानुसार एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई करावयाची असल्यास प्रथम त्या कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर अथवा बाधित कर्मचारी यास लेखी नोटीस देणे आवश्यक असते, मात्र याबाबत जगताप यांनी कुठल्याही परिस्थितीत कुठलही भाष्य केलेंल नाही,याउलट आता उपसंचालक पदी कोण हे मात्र कोड बनून राहिले आहे.
किंबहुना आधिच याठिकाणी दोन महिने झाले वसई विरार महापालिका प्रशासनाला आयुक्त नाही,उपायुक्त नाही आणि आता शहराचे नियोजन करणारा नगररचना विभागाचा अधिकारी नाही त्यामुळे ही तर मोठी शोकांतिका असल्याचे करदाते नागरिक बोलत आहेत