नालासोपारा : विरार पूर्वेकडील परिसरात राहणाºया १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची सोशल मीडियावर बदनामी होत असल्याने आईसोबत पीडित मुलगी तब्बल २० दिवस गुन्हा दाखल करण्यासाठी हेलपाटे मारत होती, पण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती. या प्रकरणी दै. ‘लोकमत’ने आवाज उठवल्यानंतर तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तंबी दिल्यानंतर विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ‘लोकमत’मध्ये ‘अल्पवयीन मुलीच्या बदनामीचा गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिसांवर चारही बाजूने टीका सुरू झाली.
वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी या बातमीची दखल घेऊन विरार पोलिसांना तंबी दिल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा आरोपी सुनीलकुमार मदेशिया याच्याविरोधात विनयभंग आणि इतर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. दै. ‘लोकमत’ने बातमी प्रसिद्ध करून न्याय दिल्याबद्दल पीडित मुलीच्या आईने ‘लोकमत’चे आभार मानले आहेत.
प्रहार संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांनीही ‘लोकमत’ने पीडित तरुणीला न्याय मिळवून दिल्याबद्दल आभार मानले असून गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करणाºया व पीडित मुलीला व तिच्या आईला केबिनमधून हाकलणाºया विरारचे पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे यांची तक्रार मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांना निवेदन पाठवून केली असल्याचेही सांगितले.
विरार पूर्वेकडील परिसरात अल्पवयीन तरुणी आपल्या परिवारासोबत राहते. गेल्या २० दिवसांपूर्वी तिचा फोटो आणि मोबाईल नंबर फेसबुक या सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी करण्यात आली होती. तसेच काही अश्लील मॅसेजसुद्धा लिहिले होते. तिला याबाबतची माहिती समजल्यानंतर घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. तेव्हापासून ही अल्पवयीन मुलगी नैराश्यग्रस्त झाली होती.
आरोपीला कडक शिक्षा व्हावी म्हणून गुन्हा दाखल करण्यासाठी आई आणि पीडित मुलगी गेल्या २० दिवसांपासून पोलीस ठाण्यात फेºया मारत होत्या. मात्र उद्या या, परवा या, आपण गुन्हा दाखल करू अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांना घरी पाठवले जात होते.गेल्या रविवारीसुद्धा पोलीस ठाण्यात गेल्यावर नेहमीप्रमाणे तेच उत्तर देण्यात आल्यावर बुधवारी पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे यांच्या कॅबिनमध्ये गुन्हा दाखल का केला जात नाही, याचा जाब विचारण्यासाठी गेल्यावर पीडितेला व तिच्या आईला केबिनमधून हाकलून दिल्याची गंभीर बाब समोर आली होती. हा एकच गुन्हा नाही, असे अनेक गुन्हे आहेत, कोर्टात जा, अशी उडवाउडवीची पोलिसांनी दिली होती.
या घटनेत गुन्हा दाखल करण्यासाठी मदत मिळावी म्हणून प्रहार संघटनेच्या कार्यालयात पीडित तरु णी व आई जाऊन सर्व हकीकत सांगितल्यानंतर पालघर जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांनी पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे यांना मोबाईलवर फोन करून गुन्हा का दाखल केला जात नाही, असे विचारल्यावर त्यांनाही मग्रूर भाषेत उत्तर देण्यात आल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सदर पीडित मुलीला हितेश जाधव यांनी विरारच्या पोलीस उपविभागीय अधिकारी रेणुका बागडे यांच्या कार्यालयात नेऊन घडलेली हकीकत आणि पोलीस निरीक्षकांची दादागिरी याची संपूर्ण माहिती देण्यात आली होती.