मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने खुल्या जागेतील थर्टीफस्टच्या पार्ट्यांसाठी तसेच लॉज, ऑर्केस्ट्रा, बार, बार व रेस्टोरंट ना नोटीसा बजावुन अग्नशिमन दलाची परवानगी बंधनकारक केली आहे. अग्नीशामक यंत्रणा नसल्यास कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिलाय. तसे असले तरी यंत्रणेची तपासणी आदींचे काटेकोर पालन करणे अवघड असुन आग सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे.
निवासी जिल्हाधिकारी यांच्या पत्रा नंतर पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी मुख्य अग्नीशमन अधिकारी प्रकाश बोराडे, उपायुक्त मुख्यालयय विजयकुमार म्हसाळ, अतिक्रमणचे सर्व सहाय्य आयुक्त तथा प्रभाग अधिकारी यांना संयुक्त कारवाई करायचे आदेश दिले आहेत. उत्पादन शुल्क व जिल्हाधिकारी कार्यालया कडुन थर्टीफस्ट साठी परवानगी दिलेल्या आस्थापनांची यादी मिळवा. त्या ठिकाणी अग्नीशमन प्रतिबंधक व्यवस्थेची पुर्तता केल्याची खात्री करावी. काही अयोग्य आढळल्यास महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम ३७६ ( अ ) नुसार कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
आदेशाची काटेकोर अमलबजावणी करुन कार्यवाहीचा अहवाल न चुकता देण्याचे सर्वांना बजावले आहे. त्या मुळे पार्ट्या ठेवणारयांसह लॉज, ऑर्केस्ट्रा बार, बार व रेस्टॉरेंट आदिंना नोटीसा बजावण्यास अग्नीशमन दलाने सुरवात केली आहे. परवान्यासाठी मुख्य अग्नीशमन केंद्रात एक खिडकी योजना सुरु केली आहे.
अग्नीशमन दलाच्या नोंदी ५१ लॉज तर आॅर्केस्ट्रा बार, बार आणि रेस्टोरंट व हॉटेल अशी ८९ संख्या आहे. तर पोलीसांच्या नोंदी ऑर्केस्ट्रा व साध्या बारची संख्याच ७० असुन लॉज देखील तब्बल ७२ इतके आहेत.
पालिकेने ऑर्केस्ट्रा बार व लॉजच्या अनधिकृत बांधकामा वरील तोडक कारवाई थांबवल्याने त्यांनी थर्टी फस्टची जय्यत तयारी केली आहे. पण येथील अग्नीशामक यंत्रणा व आपत्कालीन स्थितीत बाहेर पडण्याचे मार्ग आदीं बाबत गौडबंगाल कायम असल्याने दुर्घटना घडण्याची सर्वात जास्त भिती येथे आहे.
एकंदर शहरातील लॉज, ऑर्केस्ट्रा बार, बार व रेस्टोरंट तसेच मंडप व मोकळ्या जागां मध्ये थर्टी फस्ट निमीत्त मोठी गर्दी उसळणार असली तरी अंतर्गत अग्नीशामक यंत्रणा व आपत्कालिन व्यवस्थेचा मात्र बोजवारा उडाल्याचे चित्र असुन पालिका, पोलीस , उत्पादन शुल्क आदी विभाग कायदे - नियमांच काटेकोर पालन करायला लावतील या बद्दल साशंकताच आहे.