भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेत सत्ताधारी भाजपाने मंगळवारच्या विशेष महासभेत प्रती १ हजार लिटर पाणीपुरवठ्याच्या निवासी दरात ३ रुपये तर व्यावसायिक दरात १० रुपये वाढ करण्यास मान्यता दिली. त्यामुळे निवासी दर १० रुपयांवरुन १३ तर व्यावसायिक दर ४० रुपयांवरुन ५० रुपये होणार आहे.पालिकेला स्टेम कंपनीकडून ८६ व एमआयडीसीकडून ९० असा एकूण १७६ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्याच्या देयकापोटी स्टेम व एमआयडीसीला प्रती १ हजार लिटर पाणीपुरवठ्याकरिता अनुक्रमे १० रुपये ९५ पैसे व ९ रुपये दर पालिकेला मोजावा लागतो. तसेच पाणीपुरवठा वितरणासाठी रिलायन्स एनर्जी, टाटा पॉवर व महावितरण कंपनीला बिलासाठी लाखो रूपये मोजावे लागतात. यामुळे पालिकेला पाणीपट्टीतून गेल्यावर्षी ६८ कोटी १७ लाख ७२ हजाराचे उत्पन्न मिळाले. खर्च मात्र १६६ कोटी ४२ लाख ६१ हजार इतका झाला. यावरुन पाणीपट्टीद्वारे मिळणारे उत्पन्न त्यावर होणाºया खर्चाच्या तुलनेत कमी असल्याने पालिकेला तोटा सहन करावा लागतो.पालिकेला प्रती १ हजार लिटर पाणीपुरवठ्यासाठी एकूण १४ रुपये ५० पैसे खर्च येत असला तरी नागरिकांना मात्र १० रुपये दरानेच पाणी वितरीत केले जाते. यात पालिकेला साडेचार रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. त्यातच पालिकेला एमएमआरडीएकडून ११८ व जलसंपदा विभागामार्फत १०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा सूर्या धरणातून मंजूर करण्यात आल्याने ही योजना एमएमआरडीए राबवणार आहे. ही योजना शहरातंर्गत पूर्ण करण्यासाठी पालिकेला मोठ्या प्रमाणात निधी उभारावा लागणार असल्याने पालिकेचे उत्पन्न आवश्यक ठरले आहे. परिणामी वाढलेल्या उत्पन्नामुळे योजना पूर्णत्वावासाठी कर्जाचा मार्ग मोकळा होणार असल्याने पाणीपट्टीच्या निवासी दरात ३ रुपये तर व्यावसायिक दरात १० रुपये वाढ करण्याचा ठराव भाजपाच्या गीता जैन यांनी मांडला. तत्पूर्वी १६ डिसेंबरच्या स्थायी समिती बैठकीत निवासीदरात २ व व्यावसायिक दरात १० रुपये वाढ करण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र महासभेत भाजपाने त्यात आणखी एक रुपयाची वाढ मंजूर केली तर व्यावसायिक दर जैसे थे ठेवला. त्यावर विरोधी पक्षाने तीव्र विरोध दर्शवला.
मीरा-भार्इंदरचे पाणी महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:04 AM