मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेचे कर्मचारी केलपी घडशी रा. उत्तन यांना अनोळखी मारेकऱ्याने धारदार शस्त्राने डोके व पाठीवर वार करुन जखमी केल्याची घटना काशिमीरा भागात घडली आहे.केलपी घडशी व रवी सानप हे दोघे निलकमल नाका जवळील स्वागत ऑर्केस्ट्रा बारमध्ये बुधवारी रात्री बसले होते. त्यावेळी घडशी हे परिचीत आरिफ सिद्दीकी भेटल्याने त्याच्या सोबत बारच्या बाहेर बोलत थांबले. तोच एका गाडीतुन आलेल्या चार - पाच जणांपैकी एकाने जवळ येऊन मारहाण सुरु केली. त्यासरशी सिदद्दीकी पळुन गेला. पण घडशीच्या पाठ व डोक्यावर मात्र धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. जखमी घडशीला भिमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर सिद्दीकी हा अनधिकृत बांधकामांची तक्रार करत असल्याने अशाच एखाद्या प्रकरणातून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. पण घडशी सोबत असल्याने त्यांच्यावरच वार केले गेले, अशी शक्यता वर्तवली जात आहे. स्वत: घडशी यांनी देखील सिद्दीकीला मारण्यासाठी हल्लेखोर आले होते, असे सांगितले. काशिमीरा पोलीसांनी या प्रकरणी एक अनोळखी हल्लेखोराविरुध्द गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
मीरा भाईंदर पालिका कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 8:54 PM