लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - कोरोना संसर्गाच्या संकटात सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली असताना दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारे विक्रेते मात्र मापात पाप करून ग्राहकांची लुबाडणूक करत असल्याचा प्रकार वाढीला लागला आहे .
कोरोना संसर्ग झपाट्याने पसरून रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढले आहे . लोकं मास्क न घालता गर्दी करत फिरत असल्याने कोरोनाचा संसर्ग आणखी झपाट्याने पसरत असल्याने फळ - भाजी , किराणा , मटण आदी विक्रेत्यां वर निर्बंध आणतानाच घरपोच सेवेवर भर देण्याचा नियम लागू केला आहे . अनेक ठिकाणी पालिकेने ठरवून दिलेल्या जागेत तर अनेक ठिकाणी लपून भाजी - फळ विक्रेते व्यवसाय करत आहेत . भाजीवाले तर बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यां मध्येच भाज्या बांधून त्याची विक्री करत आहेत .
अश्या स्थितीत अनेक विक्रेते हे वजनात पाप करत असल्याचे आरोप होऊ लागले आहेत . वजनासाठी इलेक्ट्रिक वजन काटा तसेच वजन मापे विभागाचा शिक्का असलेली वजने विक्रेत्यांनी वापरणे बंधनकारक आहे . परंतु अनेक ठिकाणी वजन काट्यात किंवा वजनात हेराफेरी करून ग्राहकांना फसवले जात आहे .
भाईंदरच्या भावना घरत म्हणाल्या कि , भाजी - फळ विक्रेते यांच्या कडून घेतलेल्या वस्तूंचे इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर वजन केल्यास ते कमी असते . असे प्रकार अनेकवेळा होतात . पण सर्वसामान्य गृहिणी प्रत्येक वेळी कुठे वजन तपासत बसणार ? त्यामुळे वजनात फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करून अश्यांचे व्यवसाय बंद करायला हवेत .
मच्छिमार नेते आणि शिवसेना शहर प्रमुख बर्नड डिमेलो यांनी एका मटण विक्रेत्याने मापात पाप करून लोकांची चालवलेली फसवणूक उघडकीस आणली आहे . उत्तन नाका जवळ खाडी वर बांधलेल्या एका मटणाच्या दुकानात रविवारी डिमेलो हे गेले असता दुकानदाराने वजनकाट्यावर वजन दाखवून मटण दिले . डिमेलो यांना संशय आल्याने त्यांनी इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर पुन्हा वजन करण्यास सांगितले असता तब्बल १५० ग्राम मटण कमी असल्याचे उघड होताच विक्रेत्याच्या तोंडचे पाणी पळाले .
शहरात वजनमापे विभाग झोपा काढत असून त्यांच्या संगनमतानेच ग्राहकांची लूट सुरु असल्याचा आरोप करत डिमेलो यांनी सदर घटनेची तक्रार केली आहे . शहरात अनेक मटण व फळ - भाजी विक्रेते तसेच किराणा विक्रेते आदी सदोष वजनमापे व काटे वापरून कमी वजनाचे सामान देउन नागरिकांची सर्रास लूट करत आहेत . हे प्रकार नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना आणि फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांना धडा शिकवू असा इशारा डिमेलो यांनी दिला आहे .