मीरारोड - प्लॅस्टिक बंदीमुळे नागरिक व व्यापाऱ्यांना कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यासह गरजू महिलांना कापडी पिशव्या शिवण्यासाठी मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय मीरा भाईंदर महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीने घेतला आहे. लवकरच प्रशिक्षण सुरू करून त्यातून रोजगार मिळवून देण्याचे प्रयत्न समिती करत असल्याचे सभापती शानू गोहिल यांनी सांगितले . प्लॅस्टिक बंदीमुळे पर्यायी कापडी पिशव्यांची कमतरता भासत आहे. प्लॅस्टिक मुक्त शहर करण्याचा निर्धार सर्वांनी केला आहे. महिला बाल कल्याण समितीमध्ये आम्हीदेखील प्लॅस्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन व्हावे यासाठी शहरातील गरजू महिला, बचत गट मधील महिलांना कापडी पिशव्या बनवण्याचे मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय सर्व महिला नगरसेविकांनी मिळून घेतला आहे . त्यासाठी आमदार नरेंद्र मेहता व महापौर डिंपल मेहता यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे गोहिल म्हणाल्या.
कापडी पिशव्यांना असलेली मागणी पाहता गरजू महिला - मुलींना त्याचे प्रशिक्षण दिल्यास त्या घरच्या घरीच कापडी पिशव्यांची निर्मिती करू शकतील. यातून त्यांना रोजगार मिळेल . या प्रशिक्षणाचा कालावधी १ महिन्याचा असेल. त्यासाठी आर्थिक तरतूद केली असून प्रशिक्षक नेमण्याची कार्यवाही सुरू आहे. भाजपाच्या नगरसेविका दीपिका अरोरा यांनी प्रशिक्षण देण्याचा ठराव मांडला तर काँग्रेसच्या रुबिना शेख यांनी त्यास अनुमोदन दिले .
पिशव्या बनवण्यासाठी आवश्यक सहकार्य करणार आहोत. तसेच बनवलेल्या पिशव्यांना बाजारपेठ मिळावी म्हणून शहरातील विविध व्यावसायिक, उद्योजक आदींशी संपर्क साधून त्यांना या गरजू महिलांनी बनवलेल्या कापडी पिशव्या घेण्यासाठी विनंती करणार आहोत असे शानू यांनी सांगितले .