मीरा रोड - पाच महिने झाले तरी दवाखाना आणि प्रसूतीगृहाच्या आरक्षणात बांधलेल्या ७११ रुग्णालय प्रकरणी पालिकेने देय जागा ताब्यात घेऊनही अद्याप तेथे दवाखाना आणि प्रसूतिगृह सुरू करण्यात आलेले नाही. या घटनेच्या निषेधार्थ जिद्दी मराठा संस्थेने रविवारपासून पालिका मुख्यालयाबाहेर साखळी उपोषण सुरू केले आहे. यामध्ये भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या रुग्णालयाचाही समावेश आहे. संबंधितांवर कारवाई करुन ७११ कंपनीला काळ्या यादीत टाकण्यासह लाचार आयुक्त व प्रशासनाविरोधात आता माघार घेणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिलाय.२०११ साली परवानगी घेऊन ७११ कंस्ट्रक्शन कंपनीने दवाखाना आणि प्रसूतीगृहाच्या आरक्षणात २०१३ पासून स्वत:चे रुग्णालय सुरु केले. पण महापालिकेला सुमारे ४ हजार ६६० चौरस फुटाचे दोन मजली दवाखाना आणि प्रसूतीगृहाचे बांधकाम विनामूल्य बांधून दिले नाही. उलट आमदार मेहता यांनी स्वत: २०१६ मध्ये पालिकेला पत्र देऊन बांधकाम पालिकेस हस्तांतरण करण्यात सुट द्यावी, अशी मागणी केली.७११ रुग्णालय सुरू असताना नागरिकांना पालिकेच्या प्रसूतीगृह व दवाखान्याची सुविधा मात्र मिळत नसल्याने जिद्दी मराठा प्रतिष्ठानचे प्रदीप जंगम यांनी आमरण उपोषण सुरु केले. यानंतर जुलै २०१७ मध्ये पालिकेने ३ महिन्यात इमारत ताब्यात घेण्याचे लेखी आश्वासन दिले होते. पण ताब्यात घेणेतर सोडाच उलट ऑगस्ट २०१८ च्या पालिका निवडणुकीत भाजपाचे आणि नंतर महापौर डिंपल मेहता यांचे पक्ष कार्यालय उघडण्यात आले.जंगम यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली असता आयुक्तांनाच हजर राहण्याचा आदेश झाला. त्या नंतर पालिकेला देय असलेले बांधकाम करारनामा करुन पालिकेस हस्तांतरीत करण्यात आले. विनाभोगवटा रुग्णालय चालवण्यासह कर आकारणी न केल्याने पालिकेने त्याचे सुमारे २४ लाख रुपये कंपनीकडून वसुल केले. त्या अनुषंगाने ऑगस्ट २०१८ मध्ये लोकायुक्तांनी तक्रार निकालात काढली.पण त्यालाही पाच महिने झाले तरी पालिकेने अद्याप तेथे दवाखाना व प्रसुतीगृह सुरुच केलेले नाही. त्या निषेधार्थ अखेर प्रदीप जंगम यांनी साखळी उपोषणाचा इशारा देत पालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन सुरु केले आहे. जंगम यांच्या सह कृष्णा गुप्ता व अन्य लोक साखळी उपोषणात सहभागी झाले आहेत.जंगम यांनी आंदोलन सुरु केल्याने पालिका प्रशासनाची पुन्हा धावपळ सुरु झाली आहे. नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक श्रीकांत देशमुख यांनी लेखी पत्र देऊन उपोषणास बसू नये,अशी विनंती केली आहे. पण जंगम यांनी आमदार मेहता, महापौर डिंपल, आयुक्त खतगावकर यांच्यावर संगनमताचा आरोप करत नागरिकांसाठी पालिका दवाखाना आणि प्रसुतीगृह सुरु करेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मीरा रोड : रुग्णालयांमध्ये प्रसुतीगृह सुरू करण्यास पालिकेची टाळाटाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2019 6:28 PM