मीरारोड - मीरारोड पोलिसांनी त्यांच्या हद्दीत घडलेल्या चेन स्नॅचिंग व मोबाईल हिसकावल्याच्या ३ गुन्ह्यात चार आरोपीना अटक केली आहे. गुन्ह्यातील आरोपीना पकडण्यासाठी पोलिसांनी सुमारे १०० ते १५० सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. मीरा गावात कृषणस्थळ भागात राहणारे व निवृत्त महापालिका अधिकारी दादासाहेब खेत्रे ( ६१ ) यांच्या हातातील मोबाईल महाराजा बँक्वेट हॉल जवळ चोरट्याने बळजबरीने हिसकावून नेला होता . त्या प्रकरणी शोएब खान ( २२ ) रा. शिमला कॉम्प्लेक्स, महाराजा बैंक्वेट हॉलच्या बाजुला ह्या लुटारूस अटक करून गुन्हयात वापरलेली मोटर सायकल व लुटलेला मोबाईल असा ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
मीरारोडच्या रामदेव पार्क भागात राहणाऱ्या ६१ वर्षीय प्रतिभा गोरे ह्या भाजी विकत घेऊन घरी चालत जात असताना लुटारूने दुचाकी वरून येऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ जबरीने खेचुन पळुन गेला होता. पोलिसांनी त्या प्रकरणात वसीम शेख (२८) रा. गौरव पॅराडाईज, दस्तर खान हॉटेलजवळ, बेव्हर्लीपार्क, मीरारोड ह्याला अटक केली . त्याच्या कडून गोरे यांचा १५ ग्रॅम वजनाचा दागिना व गुन्हयात वापरलेली दुचाकी असा ७५ हजार ररुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तिसऱ्या गुन्ह्यात दीपक रुग्णालय समोर पद्मनाभ दर्शन मध्ये राहणारे आशुतोष ओझा ( ३४ ) हे शांतीपार्क परिसरात मित्र येणार असल्याने त्याची वाट बघत मोबाईल मधील बँकिंग ऍप पहात होते. त्यावेळी दोघा लुटारूंनी ओझा यांच्या हातावर फटका मारुन त्यांचा १ लाख ५५ हजार रुपयांचा मोबाईल जबरीने खेचुन पळून गेले होते . पोलिसांनी मोहम्मद इक्बाल अन्सारी ( २२ ) रा. रायगड चाळ, डोंगरी काशीमीरा व दिलीप भुल ( १९ ) रा . रितु पॅराडाईज, जी.सी.सी. क्लब जवळ, मीरारोड ह्या दोन्ही लुटारूंना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व मोबाईल असा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
मीरा भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे व सहायक आयुक्त महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली मीरारोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील , गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष सांगवीकर, उपनिरीक्षक किरण वंजारी, गजानन जिंकलवाड सह प्रशांत महाले, प्रफुल्ल महाकुलकर, प्रदीप गाडेकर, बालाजी हरणे, परेश पाटील, तानाजी कौटे, शंकर शेळके, अथर्व देवरे यांच्या पथकाने हे तिन्ही गुन्हे उघडकीस आणले.