वसई : ऐतिहासिक नरवीर रणवीर चिमाजी अप्पांच्या किल्ल्यात दिवसेंदिवस विविध गैरप्रकार होताना दिसत आहेत. जेवणावळी असो की ओल्या पार्ट्यांसोबत प्री-वेडिंग फोटोग्राफी, विवाहपूर्व छायाचित्रणाच्या नावाखाली बीभत्स छायाचित्रण आणि प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे आदी अनेक गैरप्रकारांच्या तक्रारी करूनही पुरातत्त्व विभाग कोणतीही कापवाई करीत नसल्याने येथील दुर्गप्रेमींनी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
वसईतील पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला ऐतिहासिक किल्ल्यास दररोज अनेक पर्यटक भेट देत असतात. मात्र वसईच्या किल्ल्यात कोणत्याही प्रवेशमार्गावर तपासणी केंद्र नसल्याने दिवसा कोणत्याही वेळी तसेच रात्री-अपरात्री या ठिकाणी कोणीही येतो. त्यामुळे किल्ल्यात विविध गैरप्रकारांना ऊत आला आहे. अनेक जण पुरातत्त्व खात्याची कोणतीही परवानगी न घेता किल्ल्यात येऊन बिनधास्त आपल्याला हवे तसे चित्रीकरण करतात. हे चित्रीकरण कशाचे असते याची माहितीही पुरातत्त्व विभागाला नसते.
वसई किल्ल्यातील विशेषत: संत गोन्सालो गार्सिया चर्च तसेच सेंट फ्रान्सिस्कन चर्चचा वापर हा विनापरवानगी मोठ्या प्रमाणात विशिष्ट उत्पादनाच्या जाहिरात चित्रीकरणासाठी केला जात आहे. दरम्यान दिवस-रात्र या ठिकाणी प्री-वेडिंगच्या नावाखाली सर्रास चित्रीकरण सुरू असते. कित्येक वेळा कोणतीही परवानगी न घेता त्यांना हवी तशी छायाचित्रे घेतात, काही वेळा चित्रीकरणही करतात. दुर्गमित्रांनी गैरप्रकाराच्या तक्रारी केल्या की त्याची नोंदवहीत दखल घेतली जाते. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होत नाही, अशी खंत इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत यांनी व्यक्त केली आहे.प्री-वेडिंग फोटोग्राफी डोकेदुखी?च्वसईत सध्या विवाहपूर्व छायाचित्रणाचा धुमाकूळ सुरू असून यासाठी वसई किल्ल्याची निवड केली जाते. विवाहपूर्व छायाचित्रणाच्या नावाखाली काही जण अश्लील वाटावे असे छायाचित्रण करतात.च्यासाठी किल्ल्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तूही पायदळी तुडविल्या जातात. वसई किल्ल्यात महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील पर्यटकही येतात.च्खरे तर या ठिकाणी महापालिका व स्थानिक पोलीस प्रशासन यांनी विशेष लक्ष घालून पुरातत्त्व खात्याशी संपर्क करून एक संयुक्त कारवाई राबवणे आवश्यक आहे, मात्र तसे होत नाही.मागील वर्षीच्या आंदोलनाची दखल कागदावरच !वसई किल्ल्यातील गैरप्रकारांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील दुर्गप्रेमी तथा इतिहास अभ्यासकांनी गतवर्षी १५ आणि १६ डिसेंबर रोजी किल्ल्यात आंदोलन केले होते. त्या वेळी किल्ल्यातील सर्व गैरप्रकारांवर कारवाई करण्याचे आश्वासन पुरातत्त्व विभागाकडून देण्यात आले होते, मात्र आजपर्यंत याविरुद्ध कोणतीही ठोस अशी कारवाई झाली नाही.आता किल्ला वाचविण्यासाठी बेमुदत उपोषण !या पुढील आमचे दुर्गप्रेमीचे आंदोलन बेमुदत उपोषण असणार आहे. सरकारची मानसिकता नसेल तर ती बदलण्यास आम्ही भागपाडू, असेही इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत यांनी स्पष्ट केले.