तलासरी - तलासरी तालुक्यातील वरवाडा येथील शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाने इयत्ता १०वीच्या विद्यार्थिनींसाेबत गैरवर्तन केल्याची तक्रार मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी यांच्याकडे केली. याची दखल घेत चौकशीकरिता समिती शाळेत दाखल झाली आहे. आदिवासी विकास विभागामार्फत चालवणाऱ्या शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थिनींसोबत होणाऱ्या गैरप्रकारामुळे मुलींना शिक्षणासाठी कसे ठेवायचे, असा प्रश्न पालकांना पडला आहे.
वरवाडा शासकीय आश्रमशाळेत इयत्ता १०वीत परिसरातील गावांतील एकूण ७६ मुली शिक्षण घेत आहेत. त्यापैकी १९ मुलींनी तक्रार अर्ज केला आहे. विद्यार्थिनींनी परीक्षा संपल्यानंतर घरी गेल्यावरही त्यांनी पालकांना मुख्याध्यापक गैरवर्तन करीत असल्याचे सांगितले. संतापलेल्या पालकांनी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र, मुख्याध्यापक अशोक पवार यांनी आरोपांचे खंडन केले आहे. दरम्यान, प्रकल्प अधिकाऱ्यांनी नेमलेल्या समितीतील डहाणू प्रकल्पाचे सहायक प्रकल्प अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, पाच सदस्यीय महिलांनी गुरुवारी दुपारी आश्रमशाळेतील कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थिनींची चौकशी केली.
पोलिसांकडून नियमित भेटतलासरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आश्रमशाळांना तलासरी पोलिसांकडून नियमित भेटी दिल्या जातात. मुलींना महिला पोलिसांकडून मार्गदर्शन केले जाते. पोलिसांनी मुलींना अडचणीच्या वेळी फोन करण्यासाठी मोबाइल नंबरही दिले आहेत. पोलिस काका, दीदी असे ग्रुप तयार केले आहेत, असे असताना प्रकल्पात तक्रार केल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत.
शाळेत नियमित बैठकावरवाडा आश्रमशाळेत शालेय शिक्षण समिती कार्यरत असून ही समिती शाळेत नियमित बैठका घेते. मुलींची चौकशी करते; पण शालेय समिती गावातील असून मुलींनी यांच्याकडे तक्रार केली नसल्याचे वरवाडा गावचे सरपंच दीपक डोंबरे यांनी सांगून या प्रकरणाची आम्ही माहिती घेत असल्याचे सांगितले.